मी एकदा हरवले तेव्हा...

मी एकदा हरवले तेव्हा...

मी तेव्हा लहान, म्हणजे चौथीत असतानाची ही गोष्ट. वार्षिक परिक्षा संपली आणी उन्हाळी सुट्टीला आम्ही सगळे मामाकडे गावी जायला निघालो. आम्ही म्हणजे मी, माझे आई-वडील, माझे  दोन्ही भाऊ आणी माझे मामा. मामा आम्हाला न्यायला मुंबईला आले होते.

उंब्रजला जाणाऱ्या एका खाजगी टुर्स च्या बसने आम्ही निघालो. त्यावेळी घाटावर काही अपघात की काय कारणामुळे गाडी बराच वेळ हळूहळू पुढे सरकत होती. ज्यामुळे उंब्रजला पोहोचायलाच आम्हाला जवळ-जवळ दुपार झाली. मला प्रवासात गाडी लागते ., निघताना काही खाल्ले असेल ते घाटातल्या नागमोडी वळणांवर आलो की अक्षरशः ढवळून निघते. गावी पोहोचेपर्यंत पोट रिकामे होईस्तोवर सगळे उलटून होते. त्यादिवशी ही असेच घडले.

गाडी एस्.टी.स्टँड पासून थोड्या अंतरावर थांबली. आमची बसमधून खाली उतरायची लगबग सुरु झाली. माझ्यात चालण्याचे अजिबात त्राण उरले नव्हते. कोणी उचलुन घरापर्यंत नेले तर बरे होईल असेच वाटत होते. पण कोण घेणार..?? मामा आणी पप्पांकडे कपड्यांच्या बँगा,आईच्या कडेवर आमचं धाकटं शेंडेफळ आणी दोन नंबर भावाने तिचा हात धरलेला. मी गुपचुप आईचा पदर धरुन तिच्या मागून चालत गाडीतून उतरले. चालताना आईला अडखळल्यासारखे झाले म्हणून ती मला रागावून म्हणाली "लहान आहेस का आता, पदर धरुन चालायला..??, सरळ चाल सोबत आमच्या.."

मी चिडून तिचा पदर सोडला आणी खाली मान घालून तिच्या मागे चालायला लागले. डोक्यात विचार सुरु होते.. ' ह्यांना कोणालाच माझी काळजी नाहिये.., मला इतकी भूक लागलीये.., रात्रभर बसून पाय दूखतायत.., चालता पण नाही येतेय पण कोणाला पर्वाच नाहीये.' आणी विचार करता करता मी जाऊन तिच्यावर आदळले. तिथे खूप गर्दी होती त्या धक्काबुक्कीत मी हरवेन म्हणून तिचा पदर परत हळुंच धरला. तिने पदर हिसकावून घेत " ये पोरी कोण गं तू..?? माझी साडी का धरलीयेस..??" विचारलं आणी मी दचकून वर मान करुन बघितलं तर ती माझी आई नव्हतीच. इतका वेळ मी दूसऱ्याच कुठल्या बाईच्या मागे चालत होते.

मी प्रचंड घाबरले "माझी आई कुठेय..? मी तिचा पदर धरला होता..." घाबरुन इकडे तिकडे बघायला लागले तर रस्त्याच्या पलीकडे मला आम्ही मुंबईवरुन आलो ती बस दिसली. मी रस्त्यावरुन धावत पलिकडे बसकडे गेले बसमध्ये चढून "आई-पप्पा" हाका मारायला लागले. मी रडत होते बघून एका माणसाने मला विचारले "तू कोण..??,कुठे राहते..??" वगैरे. मी रडत रडतच बोलले "माझी आई हरवलीये..., मी मुंबईला राहते.., आम्ही उंब्रजला आलोय... ह्याच गाडीतून आलो आत्ता...काका माझे आई-पप्पा शोधून द्या ना प्लीज्.....".

ते काका मला तिथुनच जवळच्या पोलीस चौकीत घेऊन गेले. तिथे पोलिसांना बघून मी अजूनच रडायला लागले. "अगं हे पोलिसकाका शोधतील तुझ्या आई-पप्पांना" सांगून त्यानी मला शांत केलं. पोलिस चौकी मधले पोलिस तेव्हा जेवत होते. ते आणी हवालदार मला नी त्या काकांना प्रश्न विचारायला लागले..."तुझं नाव काय ..??, कुठे राहतेस..?? सोबत कोण कोण होतं..?? घरातल्यांचे कोणाचे कपडे कोणत्या रंगाचे माहितेयत का..??" वगैरे.. मी आठवेल ते सगळं सांगितलं. "माझ्या आईने साडी नेसलीये, दोन्ही भावांनी एकसारखे कपडे घातलेत, मेहंदीच्या रंगाचे कपडे आहेत दोघांचे आणी आम्ही आत्ता उंब्रजच्या एस.टी.स्टँडला चाललो होतो." हे सगळं सांगून झाल्यावर ते काका मला तिथेच ठेऊन तिथून निघून गेले. ते पोलिस मला "भाजी चपाती खातेस का ..??, चॉकलेट खाणार का..??, बिस्किट आणू का..?? विचारुन शांत करत होते. पण मी आपलं "मला आई पाहिजे..,मला घरी घेऊन चला" हाच जप करत रडत होते. एव्हाना माझ्या आवाजामुळे तुरुंगातले कैदी पण जागे झाले होते. मी आता मला आई-पप्पा कधीच भेटणार नाहीत समजून ओक्साबोक्शी रडत होते. भूक तर मेलीच होती. ते सगळे सापडेपर्यंत मी अजिबात काही खाणार नाही असच ठरंवलं. एकदा त्या पोलिसांना ओरडलेही "तुम्हाला कळत नाहीये का..??मला माझी आई पाहिजे.., जेवण नको.".

ईतक्यात ते मघाशी गेलेले काका परत आले आणी पोलिसांना म्हणाले हिने मघाशी सांगितले तशी सारख्या कपड्यातली मुलं आणी एक बाई मी पाहिली स्टँडवर तिला दाखवून आणतो. मला घेऊन ते आणी एक हवालदार स्टँडकडे गेले. लांबूनच बोट दाखवून विचारले "बघ तेच आहेत का तुझे भाऊ ..?" मी रडु आवरत "हो काका तेच आहेत" म्हणाले आणी त्यांचा हात सोडून पळत सुटले.

आईला जाऊन मिठी मारली. "आई तू कुठे होतीस..?? मी किती शोधलं तुला ..??, किती भीती वाटली मला.." बोलत रडायला लागले. आईला कळेचना काय झाले "अगं तु मामाबरोबर गेलेलीस ना एकटी कशी आलीस..?" आणी मामा कुठेय..?" तिला वाटले मी मामांसोबत गेलीये गावात जायला जीप,वडाप मिळतेय का बघायला. आणी मामांना वाटले मी पप्पांसोबत गेलीये एस.टी. ची चौकशी करायला. एकुणच कोणालाच माहित नव्हते की मी हरवलेय. मी त्या सगळ्यांवर खुप चिडले. मी कुठे कुठे शोधलं त्यांनां..??, पोलिलचौकीत कशी गेले हे सगळं सांगितलं. आईला खुप वाईट वाटले तिच्या ओरड्यामुळे मी तिचा पदर सोडला आणी हरवले म्हणून.

मी मागे वळून ते काका आहेत का बघितलं तर काका सगळं व्यवस्थित असल्याची खात्री होईपर्यंत थांबले होते. त्या काकांनी लांबूनच मला हात करुन निरोप दिला, मोठ्याने "काळजी घ्या" बोलले आणी निघाले. मी ही हात वर करुन त्यांचे आभार मानले. आईच्या कुशीत शिरुन भावांना कवटाळुन परत रडायला लागले.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬