Posts

Showing posts from 2017

माझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat

Image
#मसालेदार_शाही_खजाना/Shahi chat *Ingredients 1 bowl corn, 2 tbsp small pieces of paneer, 2 tbsp small pieces of Simla mirch, 5-6 Badam, 5-6 kaju, 1 tbsp kishmish,/manuka, 2 tbsp chopped pineapple, 2 tbsp oil *Spices as per your taste Chilly powder, Aamchur powder, Salt & crushed sugar *How to make Receipe Take 2tbsp oil in a kadhai  and fry kaju,Badam, kishmish alltogether and keep aside. Then fry paneer in same oil & keep aside. Lastly add corns and roast them 2 minutes on low flame Now add chopped Simla & chopped pineapple  saute for a minute and switch of the gas. Add all the Spices, sugar and the fried ingredients together. mix well & Serve hot this spicy, juicy shahi chat😋😋 Enjoy This winter with my lovely recipe 😋😘 @$m!

सेलिब्रेशन

💁 सेलिब्रेशन आज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा. "खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.  रात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही  बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण  सकाळीच झाली. सकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.  मग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

Image
 युग(गंपू) २० महिने लहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते! अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो.  असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा. मी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला

गंपूच्या गोष्टी - लब्बाड नकल्या

Image
लब्बाड नकल्या... गंपू वय १९ महिने लहान मुलं घरातल्या लोकांच, मग हळुहळु बाहेरच्या लोकांचपण अनुकरण करतात. बऱ्याचदा आपल्याला माहितही नसलेले आपलेच बारकावे ही मुलं अचूक टिपतात. आता आमच्या युगचचं घ्या जशीच्या-तशी आमची नक्कल करायला लागलाय. कालचीच गोष्ट दुपारी त्याचं जेवण झाल्यावर मी माझं ताट वाढून घेतलं. पोटात भर पडली की तो त्याचा एकटाच खेळतो. मग तहान लागली, शु आली तरच त्याला मी हवी असते. तर असाच खेळता खेळता तो देवाच्या खोलीत गेला., तशी मीही माझं ताट घेऊन , देवाच्या खोलीत पटकन डोकावता येईल असा आडोसा शोधून बसले. देव्हाऱ्यात निरांजन लावलेलं होतं. म्हणून तो देवाऱ्ह्यासमोर जाऊन हात जोडून बसला. पप्पा हळु आवाजात प्रार्थना म्हणतात  तशीच कमी आवाजात "आ..भीश्श्..बीज्ज...तका.....तुका.." असली काहीतरी प्रार्थना तोंडातल्या-तोंडात बोलून झाली की हळुच बाहेर डोकावून बघितलं 'आई मला बघत तर नाही ना..'. मग देवाऱ्याच्या एका बाजूने जाऊन कुंकवाच्या करंड्यात बोट बुडवून कपाळावर टिक्का लावला (समोरुन हात पोचला असता पण समोर निरांजन सुरु होतं , त्याने हात भाजतो हे त्याला चांगलंच माहित झालंय) आ

माझी खवय्येगिरी - कढी-पकोडे

Image
आमचा आजचा उपद्व्याप.....कढी-पकोडे -  रात्रीच्या जेवणात....सहजच...... नेहमीच्या भाजी-पोळी, वरणभाताला आज सुट्टी🙌 #कढी_पकोडे_रेसिपी १ वाटी घट्ट पण आंबट दही, १ वाटी खोवलेला ओला नारळ, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धा ईंच आलं, ३-४लसूण पाकळ्या, २चमचे कोथिंबीर एकत्र करुन मिक्सरवर बारीक फिरवून घ्या. वाटलेलं मिश्रण कडीपत्ता, मोहरी, जिरे, हळदीच्या फोडणीत ओतलं. कि चमच्याने ढवळून त्यात १ ग्लास पाणी ओतावे. या कढीत पकोडे मुरवायचेत आणखी पातळ हवे असेल तर १वाटी पाणी वाढवा. पकोडे करणार नसाल तर कढी तुम्हाला हवी तितकीच पातळ करा. कारण कढीचा आंबटपणा जाता कामा नये.  पकोडे :  एक वाटी मूग डाळ चार तास भिजवून मिक्सरवर  भरडताना त्यात चार मिरच्या, जिरे, आल्याचा छोटासा तुकडा घालून फिरवा. मग त्या पिठात थोडी कोथिंबीर, चिमुठभर मिरपूड, किंचित सोडा घालून भजी तळून काढा. ती गरमागरम असतानाच कढीत टाका म्हणजे छान मुरतील. अर्धीच भजी कढीत टाका बाकीची तोंडी लावायला राहूद्यात. पंधरा मिनिटांनी कढी-पकोडे भात किंवा भाकरी/पोळीसोबत सर्व्ह करा. टीप १ : ईथे अगदीच वेळ नसेल तर आपली रेग्युलर कांदा-भजी करून कढीत टाकून खायलाही छान ला

गंपूच्या गोष्टी - #कामकरी_गंपू #ओ_काक्का'

Image
#कामकरी_गंपू #ओ_काक्का'  गंपूच्या गोष्टी वय :- १७ महिने आजची सकाळ नेहमीसारखीच! अलार्मचा कानोसा माझ्याआधी माझ्या लेकानेच घेतला. अलार्म बंद करुन त्याला हलकेच थोपटले तसा पुन्हा गुडुप झोपला. आता लागलीच ऊठून दारं खिडक्यां उघडून सकाळची ताजी हवा फुफ्फुसात भरुन घ्यायची आणी अंघोळपाणी आटोपून स्वयंपाक-पाण्याकडे वळायचं. माझ्या आईच्या भाषेत रामागड्याच़्या ड्युटीला लागायचं. पण पिल्लु आईच्या दोन पावलं पुढेच नेहमी..., साखरझोपेत उशाला आईचीच कुस हवी म्हणून तिला गुरफटून झोपणार. तरीही आई सोडून जाईल की काय या भीतीपायी ईवल्याशा मुठीत तिच्या कपड्यांचं टोक पकडून ठेवणार. आधीच त्या माऊलीला झोपलेल्या निरागस बाळाच्या कुशीत झोपायचा मोह आवरेना., त्यात त्याची घट्ट मिठी आणी मुठी सोडवायची म्हणजे धर्मसंकटच. कशीबशी या मोहपाशातून निघाल्यावर आपल्या कामाला लागले. खरपुस पोळीचा आणी फोडणीचा खमंग दरवळ नाकाला झोंबला तशी बाकीची मंडळी जागी होऊन आपापल्या तयारीला लागलीत. छोटे सरकार ही मधे-मधे लुडबुडायला आलेच तोवर. त्यांना दूध-पोळी/पराठ्याचा नैवेद्य आणी झिंगाट भक्तीगीतांचं मुखदर्शन दिल्याशिवाय बाकीच्यांना आंघोळीही

मामाचं गाव- भाग १

मामाचं गाव- भाग १ लहानपणी उन्हाळी सूट्टीत मामाच्या गावी जायची मजा जवळजवळ प्रत्येक वर्षी अनूभवलीये. ते दिवस आठवले कि पून्हा लहान ह्वावेसे वाटते. कसले भारी होते ते दिवस..! वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेलं माझ्या मामाचं गाव 'तळबीड'. कूठे काळसर राखट तर कूठे तांबडी माती असलेलं. गावात एंट्री करतानाच हंबीरराव मोहीत्यांची समाधी आणी एक मोठं राममंदिर आहे. त्याच्या बाजूलाच जुनं दगडी देऊळ पण होतं आधी. मामाचं घर गडाच्या पायथ्यापासून पाच मिनिटांवर आहे. आम्ही जेव्हा लहानपणी गावी जायचो तेव्हा मामाचं घर मातीचं होतं. पूढच्या अंगणात उंबराचं झाड आणी त्या समोर तुळशी वृंदावन. मागच्या अंगणात चिंचेच (खोबरी चिंच अस काय तरी म्हणायचो) नी शेवग्याचं झाड होतं. या खेरीज चाफा, मोगरा, कर्दळ, डाळींब, पेरू, लिंबू ही झाडं पण होती. शेवग्याला लागूनच एक छोटसं छप्पर आणी छपराशेजारीच म्हशींचा गोठा. या शिवाय गवताच्या ताट्यांपासून बनवलेलं 'न्हानीघर' (बाथरूम)ही होतच. हा एवढा सगळा 'गोतावळा' असायचा ह्या घराचा..!! 'वैभव' म्हणा हवं तर या घराचं..!! आता सिमेंटच दोन मजली घर बांधलय तिथे. म्हशी,उंबर,चिंच भू

गंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू

गंपूच्या गोष्टी  युग(गंपू) वय दीड वर्ष पोट्ट्या सगळ्यांना दमात घेतोय हल्ली. माझ्याच  मोबाईल वर येणारे फोन मी त्याच्यापासून चोरून उचलते. म्हणजे ह्याच्या पप्पांचा फोन (video call) आला की तो फक्त त्यालाच द्यायचा. स्वतः बोलणार नाहीच पण नुसता फोन उलटा-पालटा करुन आपटून-आपटून पप्पा मोबाईल मधून बाहेर येतायत का बघतो. आणी मग कंटाळून व्हिडीओतल्या पप्पांना ओरबाडेलच काय, पापा काय देईल. आपण फोनला जरा हात लावला की हा रडायला सुरु. तसं त्याला रडायला कुठलंही कारण पुरतं. मी गाणं गाते!.., आरशासमोर, स्वयंपाकघरात, एकटी असताना, देवपूजा करताना,सहजच, कधी स्वत:साठी कधी माझ्याच माणसांसाठी. गाण्याची शास्त्रीय बाजु असेल थोडी कमकुवत पण गाणं गाण्यासारखंच वाटेल ईतकं बरं नक्कीच गाते. पण गंपूसमोर गायचं असेल तर त्याच्याच बुद्धीकोशात फिट्ट बसलेलं एखादं किलबिल गीत किंवा मग ढिंच्याक गाणं (हा माझा प्रांत नव्हे तरीही) गायचं. त्याच्या समोर तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा अभंग किंवा 'रैना बीती जाये..' टाईप गायला घेतलंत तर हा पोरगा धाय मोकलून रडायला लागतो. आता त्याचं हे रडणं गाण्याचा भावार्थ समजून आल

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

Image
#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा लहानपणी शेजारच्या एका कडे नवीन टिव्ही आणी केबल चँनल आले होते. आम्ही सगळ्या मुलांनी एकत्रच  'झपाटलेला' बघितला. आणी सगळ्या पोरांवर तात्याविंचू स्वार झाला. मी 'बाबा चमत्कार'चं म्हणणं जरा जास्तच सिरिअसली घेतलं. 'तात्या विंचू' सारखं आपणपण थोडे दिवस बाहुल्यात राहायला जावं वाटायला लागलं.तसं माझी एकुलती एक आवडती बाहुली घेऊन आमच्या खाटेखाली जाऊन लपले. वनरुमकिचनच्या घरात हिच एक जागा माझी आवडती होती. बाहुलीच्या अंगावर हात ठेवून सुरु केलं "ओम भग भुगे भग्नी भागोदरी............ओम फट् स्वाहा...." तिनदा म्हणायचा होता मंत्र. पण दुसऱ्या मंत्रौच्चारालाच आईने खाटेचा झालरवाला पडदा सरकवून आत वाकून बघितलं. (मी मोठ्यानं मंत्र म्हणत होते तो तिने ऐकला असावा.) बाहेरच्या लख्ख्ं प्रकाशातून आतल्या अंधुक काळोखात तिला मी नाही दिसले. तरी सुद्धा तिच्या हाती लागु नये म्हणून मी जुन्या कपड्यांच्या बोचक्याच्या मागे जाऊन लपले. आई पडदा लावून निघून गेली तसा मी माझा कार्यक्रम पुन्हा सुरु केला. "ओम भगभुगे....."😂. पण त्या बाबाने म्हटल्य

गंपूच्या गोष्टी - आई होणं सोप्पं नाहीये!

Image
गंपूच्या गोष्टी १६ महिने गंपूची आई.... परवाच एकीने रस्त्यावर हाक मारली "ओ गंपूची आई", "काय गं काय म्हणतोय तुझा गंपू.?" भारीच फेमस केलायस लेकाला!"."आम्हाला सगळ्यांना आवडतो हा तुझा गंपू" आमच्या पोरांचा तर फेव्हरेट झालाय." आता लेकाचं कौतुक कोणत्या आईला नाही आवडणार. मलाही आवडलंच! खरंतर गंपूची आई होणं सोपं नाहीये तसं! म्हणजे आईचं झोपणं, खाणं, गाणं,भाजीला जाणं, अंघोळीला जाणं, साधं शु ला जाणं सुद्धा.., तिच्या लेकराच्या मर्जीवर असतं. आमच्या घरात पण सध्या गंपूचीच मर्जी चालते. रात्री साधारण मनुष्यप्राण्याच्या झोपेच्या वेळेत, गंपूची झोपायची अजिबात इच्छा नसताना जर त्याच्यासमोर तुम्ही झोपेची आराधना करायला लागलात तर तो गपकन् तुमच्या पोटावर येऊन बसतो. समुद्राचं पाणी पोटात गेलेल्या माणसाला जसं पोटाला गचके देऊन पाणी बाहेर काढतात ना तसं जेवून टुम्म फुगलेल्या तुमच्या पोटाला गचके देऊन घोडा-घोडा खेळण्याचं अमानुष सुख हा पोरगा घेत असतो. आपल्याच घरातल्या टॉयलेटमध्ये जाण्यासाठी तुम्ही हॉल-टॉयलेट अशा फेऱ्या घालत असता आणी सोबत हा बिलंदर मागनं-पुढनं उड्या मार

लिमलेट-अंकल..🍬🍬

Image
लिमलेट-अंकल..! कधी-कधी आर्यन दादा, रिद्धी, सौमय्या, तन्वी दिदी, ओम,साई हे सगळे संध्याकाळी युग सोबत खेळायला घरी येतात. एकदा संध्याकाळी मी सगळ्या बच्चेकंपनीला चॉकलेट्स वाटले. असेच आणले होते. लहान मुलांना असतेच ना आशा खाऊची. तर दुसऱ्या दिवशी रिद्धी खेळायला आली आणी मी कामात होते. ती येऊन मला म्हणते कशी "आंटी अगर आप मुझे चॉकलेट या और कुछ देना चाहती हो तो दे सकते हो". मी हळूच हसले आणी माझ्याकडच्या दोन लिमलेटच्या गोळ्या तीच्या हातावर टेकवल्या. दोन्ही एकदम तोंडात टाकून ती गेली परत खेळायला. मला त्यावेळी आमच्या लहानपणीची लिमलेटच्या गोळ्यांची आठवण झाली. आमच्या सोसायटीतले एक अंकल नेहमी स्वत:कडे लिमलेटच्या गोळ्या ठेवायचे. ते दिसलेकी आम्ही गोळी हवी म्हणून मागे लागायचो. ते अंकल अभ्यासात खूप हुशार. इंग्रजी, विज्ञानातलं काहीही अडलं की आम्ही अंकलकडे जायचो. आमचा ट्युशनवाला दादा सुद्धा पंधरावी झाल्यावर पुढे काहीतरी शिकत होता तो सुद्धा अडलेलं काही विचारायला अंकलकडे यायचा. अहो अंकल नाही.., तर ए अंकल म्हणण्याईतपत आपला वाटायचा तो. त्यांचं नाव बऱ्याचवेळा विचारलं आम्ही. "सुब्रह्मण्यम --

माझी खवय्येगिरी - फोडणीची रवा इडली

Image
फोडणीची रवा इडली १.)*इडली मिश्रण: २ वाट्या रवा, १ वाटी दही, २-३ चमचे तूप, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ टीस्पून किसलेलं आलं, २-३चमचे किसलेलं गाजर (ऑप्शनल), १०-१२ काजुचे मध्यम आकाराचे तुकडे, मीठ चवीनुसार चिमूटभर खायचा सोडा *फोडणीसाठी: २ चमचे तेल, १ टीस्पून मोहरी, १ चमचा चिरलेला कढीपत्ता, चिमूटभर हिंग, २.) *चटणी साहित्य: १वाटी खोवलेला नारळ, २चमचे चिरलेली कोथिंबीर, २ चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १चमचा डाळे, २-३पाकळ्या लसूण, १ टिस्पून किसलेलं आलं, मीठ चवीपुरतं *फोडणीसाठी तेल १टिस्पून मोहरी, २ चिमूट जिरे, १ चमचा चिरलेला कढीपत्ता, कृती : कढईत २चमचे तूप टाकून रवा खरपुस भाजून घ्या. रवा काढून इडली मिश्रणासाठीच्या पातेल्यात काढून घ्या. त्याच कढईत एक चमचा तूप घालून काजुचे तुकडे तळून घ्या. मग तेही पातेल्यात टाका. एका कढेलीत फोडणी तयार करुन ती या मिश्रणात ओता. आता क्रमाने दही, गाजर,आले,मीठ, मिरची घालून मिसळा गरज असल्यास एकाध चमचा पाणी घाला आणी २० मिनिटे बाजूला ठेवून द्या. तोपर्यंत चटणीची तयारी करुन घ्या. चटणी साहित्यात दिलेल्या सर्व गोष्टी एकत्र मिक्सरवर

गंपूच मनोगत २

Image
गंपूचं मनोगत २ या आईने ना सगळ्यांना माझी मोदकाची गोष्ट सांगितली ना म्हणून सगळे हसतात मला. उग्गाच मला खादाड आणी हावरट-बिवरट बोलतात. पण मी अजिबात नाहीये हा तसा. उलट कधी कधीतर मला मुडच नसतो जेवायचा. पण ह्या आईला कोण सांगेल.? सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी ना आर्यन दादाच्या घरी जाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला नां  चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं.  पण आई मला रागावते नुसती..,बोलते तु खुप गोडखाऊ झालायस, सारखं गोड खाऊन पोटात किडे होतील. मी बिचारा लहान म्हणून असं काहीही बोलतात  मला. असं कधी होतं का.?? पोटात किडे बिडे.? उगाच घाबरवते ना आई. रोज ते ओवा/बडीशेप घातलेलं ईईई... गरमपाणी प्यायला लावते. काल मामा तर आईला म्हणाला "तायडे तुझा पोरगा शेरडीगत शेलकं खायला शिकलाय "  😢. म्हणजे काय ते मला नाही कळलं पण ते ऐकलं आणी आईला अचानक काय झालं काय माहीत लगेच मला हाताला पकडून एका जागी बसवून जबरदस्ती सगळा वरणभात भरवला. खूप-खूप राग आला मला दोघांचा.😫 आई फारच badgirl

पाल........

पाल....... भीती मनात असतेच नेहमी पण जोवर डोळ्यांना दिसत नाही तोवर आपण नाहीच घाबरत. आज दिसली मला ती स्वयंपाक घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात. तिचे चमचमणारे डोळे माझ्यावरच रोखलेले. राखट पिवळसर,शेवाळी रंगाचा तो बुळबुळीत प्रकार पाहून शिसारीच आली मला. पावसाचे दिवस, लाईट्स गेलेत. बाहेर मळभ दाटून आलेलं. भर दिवसा घरात काळाकुट्ट अंधार भरुन राहिल्या सारखा. मस्त पांघरून घेऊन गुडुप झोपावंसं कितीही वाटलं तरी आजची दिवसाभरातली कामं करणं भाग आहे. खिडक्या दरवाजे उघडून घरात प्रकाश झाला कि कंटाळा जाईल आपोआप म्हणून खिडकी उघडायला गेले तर समोरच ही बया. तिला बघून झोपच उडाली. आज तर सकाळपासून खिडकी उघडलीच नव्हती. म्हणजे कालच दिवसाभरात कधी तरी एन्ट्री झाली असणार या मॅडमची. रात्री घरभर फिरून मग ही जागा लपण्यासाठी फायनल केली असणार. असो पण आता दर्शन दिलय म्हटल्यावर तिला तिथून हुसकावून लावायची जबाबदारी माझीच. स्वंयपाक करतानाच पटकन पडली खाली गॅसवर तर प्रॉब्लेम. खिडकीचं दार उघडून हातात झाडू घेऊन तिला हाकलवायचा कार्यक्रम सुरु केला. पण ती ढिम्म् हलेल तर शप्पथ. जरावेळाने सरपटत थोडं पुढे येऊन मान वर उचलून गळ्यातले गलग

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

Image
मसाला ढेबऱ्या.. ढेबरी साहित्य : थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक कांदा बारीक चिरलेला, आले-मिरची-लसूण पेस्ट एक चमचा, बडीशेप-धने पावडर एक चमचा, गरम मसाला पावडर एक टीस्पून, कोथिंबीर बारीक चिरलेली दोन चमचे, हळद पाव चमचा, मीठ, तेल,पाणी अंदाजाने. सजावटीसाठी : बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टॉमेटो, चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे बटर, चीज क्युब, टोमॅटो केचअप. कृती : ढेबरी साहित्यातले सर्व पदार्थ एकत्र करून कणकेसारखा(किंचित घट्ट) गोळा मळून घ्या.एका प्लास्टिक पिशवीवर  हलक्या हाताने, ढेबरी(थालीपीठ पेक्षा किंचित जाड) थापायला घ्या. एक एक ढेबरी थापत थापतच तव्यावर किंचित तेला वर भाजायला घ्या. गावी चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेली ढेबरी उत्कृष्ट लागते. दोन्ही बाजूने खरपूस भाजलेल्या ढेबऱ्या डीशमध्ये काढून घ्या. त्यावर एका बाजूला बटर लावून मग कांदा,टोमॅटो, कोथिंबीर घालून सजावट करा. सर्वात शेवटी, केचअप आणी चीज किसून घाला. आणी सर्व्ह करा. It's yummy👌👌.  लहान मुलांसाठी परफेक्ट पौष्टिक पिझ्झा. @$m!

गंपूच्या गोष्टी - गंपूचं मनोगत (भाग१)

गंपूच्या गोष्टी वय १७ महिने गंपूचं मनोगत- भाग १ या आई-पप्पांना ना काही कळतंच नाही, नुसतं मला ओरडतच असतात. मी तरी कित्ती गुणी बाळासारखा वागतो, आईला पप्पांना कित्ती मदत करतो माहितेय का..? तरी सुद्धा नेहमी मला ओरडाच बसतो. एकदा ना मला खुप-खुप भूक लागली होती. तर मी स्वयंपाकघरात गेलो. आई कामात होती.,नेहमीच असते. मी आता मोठा झाल्यापासून माझ्यासाठी वेळच नसतो तिच्याकडे म्हणून माझा मीच खाऊ शोधला, किसलेल्या नारळाचं ताट तिथेच खाली ठेवलेलं तिने, मी फक्त थोडसंच, दोन मुठी खोबर घेतलं आणी बाहेर आलो, खाताना एकदम थोडुसंं सांडलं, आता मी छोटा बाबु आहे ना मग खाऊ खाताना सांडतो कधीतरी. पण मी खाली सांडलेला खाऊ अज्जिबात उचलून खाल्ला नाही. आई बोलते खाली सांडलेला खाऊ शी-शी झालेला असतो. मग मला अजून खाऊ पाहिजे होता. मी परत आत खोबरं आणायला गेलो तर आईने ताट उचलून कट्ट्यावर ठेवलं. मी कट्ट्यावरचं ताट ओढायला गेलो आणी त्या ताटाने पटकन उडीच मारली. ते धाssडकन् खाली पडलं. सगळं खोबरं खाली सांडलं. कित्ती कित्ती ओरडली मला आई.😭😭😭 मला खूपच रडू आलं म्हणून मी तिला मिठी मारली तरी तिने मला उचलून सुद्धा नाही घेतलं. आणी त

माझी खवय्येगिरी - झटपट झुणका

Image
#झुणका या पावसाळ्यातली पहिली अळुवडी काल केली. अळुची पानं चांगली ताजी मिळाली. वडी पण उत्तम जमली. पण दरवेळीसारखा पिठाचा अंदाज नाहीच आला. नेहमी कमीच पडतं, ह्यावेळी जास्तंच झालं. अळुच्या तीन वळकट्या होऊन ही थोडं मिश्रण उरलंच. आता एवढं तिखट,मीठ,ओवा, तीळ, कोकम पाणी, आले-लसणीचा ठेचा घातलेलं ते मिश्रण मला टाकवेना. त्याची भजी करावीत तर आधीच  घरात पावसाळी आजारपणं सुरु आहेत. तळलेलं नकोच म्हणून वडीसुद्धा थेंब-थेब तेलावर परतून घेतली. उद्या बघु काहीतरी करु म्हणून ते मिश्रण तसंच एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेऊन दिलं. आज सकाळी नाश्त्याला काय करावं सुचेना. मग तो कालच्या पिठाचा डबा फ्रिजमधून काढला, कुकरमध्ये ते पीठ वाफवून घेतलं. तोवर पराठ्यांची तयारी करुन ठेवली. कुकर थंड झाल्यावर हातानेच ती उकड कुस्करून मोकळी केली. कढईत कढीपत्ता, मोहरी, कांद्याची फोडणी तयार करून त्यात ते मोकळं बेसन घालून परतलं. वरुन असावं म्हणून चवीला अजून थोडं तिखट मीठ घातलं कोथिंबीर पेरली. सोबत प्लेन पराठे करुन केला सर्व्ह नाश्ता. पण मनात शंका होतीच काय नी कसं बनलंय देव जाणो. नाहीच आवडलं तर चहा पराठा हा सेकंड ऑप्शन म्हणून चह

गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड

गंपू वय १४ महिने माझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे  शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत.  आणी मग मी त्याला विचारलं "अरे तू काय Hippopotamus आहेस का ?" तर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं'!, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते  निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला! म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन  त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच.  'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्

गंपूच्या गोष्टी - गंपूबाळ आणी उकडीचे मोदक

Image
युग(गंपू) वय: १५ महिने गंपूबाळ आणी उकडीचे मोदक आज अंगारकी चतुर्थी!. गणपती बाप्पासाठी मी खास उकडीचे मोदक बनवायला घेतलेत. तशी उकडीच्या मोदकांची माझी पहिलीच वेळ, मला गव्हाचे तळणीचे मोदक करायची सवय कारण आईकडे तेच असायचे. मी ही तेच करायला शिकले मग तिच्याकडून.  गंपूला सांभाळून त्यात पहिल्यांदाच ह्या मोदकांचा प्रयत्न त्यामुळे सकाळीच स्वयंपाक झाला की तयारीला लागले. सारण बनवुन घेतले. आणी आधी गंपूला अंघोळ घालून झोपवले. हो!कारण त्याशिवाय मला काही शांतपणे ती उकड करायला मिळणारच नव्हती. उकड झाली की मी पीठ मळुन मोदक बनवायला घेतले. इतक्यात गंपूशेठ उठले. दिवसा त्याची झोप कमीच, अगदी वीस-एक मिनिटांची.   स्वारी ऊठून स्वयंपाक घरात आली आणी काय आश्चर्य..??,माझ्या नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे तो आज अजिबात रडला नाही की मला येऊन मिठी मारली नाही. उलट शांत माझ्या बाजुला उभा राहुन बघत होता की मी काय करतेय. पण गंप्याची शांतता म्हणजे वादळापुर्वीची शांतता. ती सुद्धा अर्ध्या-एक मिनिटांची. तेवढ्या अर्ध्या मिनिटात त्याने उकडीचा मळलेला गोळा नीट निरखून घेतला. मी कसा त्यातला छोटासा भाग काढुन उंड्यात

गंपूच्या गोष्टी - गंपूचा योगाभ्यास

'युग' गंपू वयवर्ष - १२ महिने *गंपूचा योगाभ्यास* ४ महिन्याचा असताना त्याला कुणा नावडत्याच्या/अनोळख्याच्या मांडीवर दिले कि तो एकतर तुमच्या कानठळ्या बसाव्या इतक्या मोठ्याने रडा/ओरडायचा किंवा मांडीत झोपवल्या ठिकाणीच जमेल तेवढं अंग उचलून उसळ्या मारुन 'बॉडी स्ट्रेच' सुरु करायचा. मग हळुहळु पायाची बोटं तोंडात जातील अश्या पद्धतीचं 'पवनमुक्तासन'(बंदिस्त पवन----मुक्त करणारं हेच ते आसन) जमायला लागलं. पुढे बाळ रांगायला लागलं. पाय दुखलेकी 'वज्रासन' करायला लागलं. आवडत्या गाण्यांवर 'बटरफ्लाय योगा'ला आपसुकच अंगीकारलं. बसल्याजागी 'बेलीडान्स',बटकडान्स'पण होऊन जातो कधीमधी.... आता कुठल्याही आधाराशिवाय उभं रहायची मजा घ्यायला लागलाय. उभा राहून दोन्ही हातांची एकमेकांशी घट्ट युती करुन पाय जमीनीवर रोवायचे. समोरच्याला "बघारे मी उभा राहिलोय"च्या आविर्भावात ओरडून आपल्याकडे बघायला लावायचं. आणी आपण त्याच्याकडे बघून "अजून गडी डुलतोय" म्हणेपर्यंत याने उत्साहात 'ताडासन' करायला जायचं नी धपकन् खाली पडायचं. सकाळी उठताना 'सुर

अनुभवाची फजिती - कोंबडीचे भूत !(२०१४)

अनुभवाची फजिती  - कोंबडीचे भूत !(२०१४) "तर ईथे उपस्थित माझ्या सर्व मिञ मैञिणींना माझा नमस्कार! बंधू आणि भगिनींनो......." ही अशीच काहीशी सूरूवात करण्याचा बेतात होते मी .........पण लक्षात आले मी ईथे अनुभव लिहायला आलेय . असो , हि गोष्ट फार फार वर्षापूर्वीची अजिबात नाही,अगदी कालच्याच धूलवडीची आहे ... मी मूळची सातारची असल्यामूळे मलाही धूलवडीला कोंबडीवडयांचे, मटण वडयांचे भारी आकर्षण! कारण ते खाण्याइतकेच बनविण्याचेही वेड मला आहे. पण हयावेळी असे काही घडेल याची मला मूळीच कल्पना नव्हती आज धूलीवंदन., "कोंबडीवड्यांचा घाट घातलाय खरा...., पण मला खाली बिल्डींग च्या मिञमैञिणींसोबत रंगपंचमी  खेळायला ही वेळ काढायला हवा.." असे म्हणून जरा लवकरच उठून तयारीला लागले. बाबांनीही बाजारात आज लवकर जाऊन चिकन आणले. "आज खूप गर्दी होती बाजारात, बरे झाले लवकर गेलो ते..." असे म्हणत म्हणत बाबा किचनमध्ये आले आणि चिकनची पिशवी माझ्या हातात दिली. मी ती तशीच एका भांड्यात ठेऊन भांडे बाजूला सरकवले ,म्हटले हातातले काम आधी संपवावे . बाबा चिकन घेऊन येई पर्यंत मी वडयांचे पिठ भिजवून ठेवले होत

गंपूच्या गोष्टी - गंपूची रंगपंचमी

Image
गंपू (वय - १३ महिने) धुळवडीला शेजारणीने तिच्या मुलाकडे रंगाची पुडी मागितली. त्याने सरळ रंगांच्या पुड्या ठेवलेली एक छोटी बादली तिला आणून दिली. तिने त्या बादलीतला एक रंग चिमूटभर घेतला आणि माझ्या गालाला लावला. मग बाकीच्या शेजारणीपण धावत आल्या. त्यातल्या एकीने एक पुडी बादलीत पालथी केली, त्यात थोडे पाणी मिसळले आणि तो रंगीत चिखल मला लावला. बाकीच्यांनीही परत एकदा चिमूट-चिमूट घेऊन हातभार लावला. आता हा सगळा प्रकार झाला आमच्या चिरंजीवांसमोर; ज्यांना आधी वाटलं की, या सगळ्या काकी मिळून आईला मारतायत. म्हणून हा लागला जोरात किंचाळायला. एकतर मी याला कडेवर घेऊन उभी, त्यात मैत्रिणी रंग लावतायत तो डोळ्यात जाऊ नये म्हणून मी डोळे बंद केलेत आणि हा अगदी माझ्या कानात ओरडतोय. समोर मैत्रिणींचा गलबला, हा का किंचाळतोय, काय लागलं?/चावलं?/टोचलं? “अर्रे थांबा,” जोरात ओरडून सगळ्यांना गप्प केलं आणि युगकडे वळले. त्याचा हा प्रकार माझ्या चांगलाच परिचयाचा झालाय. मैत्रिणीने माझ्या गालाला हात लावला आणि मी डोळे मिटून घेतले म्हणजे मला रडू आलेय, असा अंदाज बांधून तो किंचाळला. एरवीही कोणा दोघांमध्ये चाललेली शाब्

मी एकदा हरवले तेव्हा...

मी एकदा हरवले तेव्हा... मी तेव्हा लहान, म्हणजे चौथीत असतानाची ही गोष्ट. वार्षिक परिक्षा संपली आणी उन्हाळी सुट्टीला आम्ही सगळे मामाकडे गावी जायला निघालो. आम्ही म्हणजे मी, माझे आई-वडील, माझे  दोन्ही भाऊ आणी माझे मामा. मामा आम्हाला न्यायला मुंबईला आले होते. उंब्रजला जाणाऱ्या एका खाजगी टुर्स च्या बसने आम्ही निघालो. त्यावेळी घाटावर काही अपघात की काय कारणामुळे गाडी बराच वेळ हळूहळू पुढे सरकत होती. ज्यामुळे उंब्रजला पोहोचायलाच आम्हाला जवळ-जवळ दुपार झाली. मला प्रवासात गाडी लागते ., निघताना काही खाल्ले असेल ते घाटातल्या नागमोडी वळणांवर आलो की अक्षरशः ढवळून निघते. गावी पोहोचेपर्यंत पोट रिकामे होईस्तोवर सगळे उलटून होते. त्यादिवशी ही असेच घडले. गाडी एस्.टी.स्टँड पासून थोड्या अंतरावर थांबली. आमची बसमधून खाली उतरायची लगबग सुरु झाली. माझ्यात चालण्याचे अजिबात त्राण उरले नव्हते. कोणी उचलुन घरापर्यंत नेले तर बरे होईल असेच वाटत होते. पण कोण घेणार..?? मामा आणी पप्पांकडे कपड्यांच्या बँगा,आईच्या कडेवर आमचं धाकटं शेंडेफळ आणी दोन नंबर भावाने तिचा हात धरलेला. मी गुपचुप आईचा पदर धरुन तिच्या मागून चालत गाड

साला एक मच्छर

साला एक मच्छर!!!,🐝🐝🐝 सकाळी सकाळी छान कोवळं ऊन खिडकीतुन स्वयंपाकघरात डोकावत असतं. गँसवर मस्त आल्याचा चहा तयार झालेला असतो. समोरच ओट्यावर चहाचा कप त्यावर गाळणी ठेऊन तुम्ही चहा ओतायच्या तयारीत असता. इतक्यात एक मच्छर, रात्रभर गुडनाईट पिऊन आलेल्या गुंगीतच इकडून तिकडून डुलत येतो. त्याच आलं- घातलेल्या चहाचा वाफारा घेऊन नशा घालवावी म्हणुन ओट्यावर घुटमळायला लागतो. तुमच्या एका हातात गाळणी आणी एका हातात चहापात्र असल्यामुळे तुम्ही त्याला तोंडचलाखीनेच फूss..फूsss...करुन लांब पळवता. अर्धा चहा ओतेस्तोवर तो तुम्हाला वळसा घालुन परत येतो. तुम्ही पुन्हा त्याला तुमची भाषा समजतेच या अपक्षेने "एss.... हुssड, शूक्....शूक्, अर्रेे याssर........ जाsssना..." करत चहा गाळायचं काम अर्धवट टाकून त्याला तिथुन पळवायच्या मागे लागता. तोही तुमच्या सोबत एक-दोन सेकंद पकडापकडी खेळून झाली की येऊन चहाच्या गाळण्यावर बसतो. त्याला फटकावायच्या हिशोबाने तुम्ही एक जोरदार रट्टा त्या गाळण्याला मारता....,कपातला चहा कपासकट कलंडतो आणी गाळण्यातल्या गरमागरम चहापुडीचा लपका तुमच्या तोंडावर (ठप्पाक)येऊन बसतो. गडबडीने ती

गंपूच्या गोष्टी - ईशारों ईशारोंमे

ईशारों-ईशारों मे युग'गंपू' वय-१५महिने ती(ईशाऱ्याने): सोना ये ना रे ईकडे..थोडीशी पावडर (पावडरचा डब्बा दाखवत) लावू दे.... तो :(नकारार्थी मान डोलवत)नाही ती: (परत ईशाऱ्यातच तोंडावर विनंतीचे भाव आणत..काजळाची डब्बी दाखवत) "बरं राजा ..काजळाचा टिक्का तरी लावूया.." तो: चेहऱ्यावर लब्बाड हसू आणत...मानेनेच परत "मी नाही ज्जा" ती : खोटं-खोटं रागवून.करंगळी त्याच्या पुढ्यात नाचवत "जा मग कट्टी तुझ्याशी." Sssss Sssss Sssss आssssssssssई 😣😣😣😣 गंप्या्sssss काय केलंस हे..????? 😣😣😣😣 तो: टाळ्या वाजवत "हँ....ही..ही...ही. ती: (करंगळीवर त्याच्या दातांचे उमटलेले ठसे त्रयस्तपणे बघत)  त्याला रागाने "माझी करंगळी काय तुला लॉलीपॉप वाटली काय रे..??? तो: मंकी फेस करुन "यो...दुग्गु..डुग्गु.." 😢 इती: आगाऊगंपूची बिचारीआई

भाकरी - स्वयंपाक घरात गवसलेले सुख

Image
भाकरी स्वयंपाक घरात गवसलेले सुख-भाकरी परातीत (बाजरी/ज्वारी/नाचणीच्या )पिठाचा डोंगर घालायचा मग हातानेच त्यात मध्यभागी एक खड्डा करायचा. त्या खड्ड्यात थोडे warm (lukewarm n hot च्या मधले) पाणी घालायचे मग हळू हळू खड्ड्याच्या चहो बाजूनी असलेल्या पिठाच्या डोंगराला त्या खड्ड्यात ढकलायचं (पाडायचं). आधी हलक्या हातानेच मिक्स करायचं नंतर हात थंड पाण्यात बुडवुन (हात भाजू नयेत म्हणून) पिठ व्यवस्थित मळून घ्यायचं. आता ह्या मळलेल्या पिठावर आपलंच राज्य असतं एक एक गोळा परातीत घेऊन त्याच्या पाठीवर जोरजोरात (पण हलकेच) धपाटे घालत स्वताःभोवतीच प्रदक्षिणा घालायला लावायची अगदी त्या गोळ्याची figure maintain होईस्तोवर थापायचं. आता ह्या भाकरीला आधी तव्यात पाण्याचा हात लावून नी मग ग्यासच्या मध्यम आचेवंर वा चुलीच्या निखाऱ्याच्या धगीवर नीट भाजले की झाली भाकरी तयार. चेहऱ्यावर एकही डाग नको म्हणून भाकरीला Fair & lovely लावल्यासारखे पांढरे फटक (नाचणीची असल्यास फिरंगी लाल) बाहेर काढू नका. त्यावर आलेले छोटे छोटे ठिपके ब्युटीस्पॉट समजा तिचे. अशाप्रकारे मस्त गरमागरम खरपुस पापुद्रा असलेली किंचितशी सुटलेल्

आईची रेसिपी - गुलगुलं

Image
#गुलगुलं नुसतं नाव वाचूनपण गुदगुल्या व्हाव्यात असा मस्त पदार्थ. शाळेत असताना शनिवारच्या, दहा मिनिटांच्या मधल्या सुट्टीत खाण्यासाठी मला डब्यात दिलं जाणारं हे 'गुलगुलं'.  गव्हाच्या पिठात अंदाजानेच गूळ, चवीपुरतं मीठ आणी आवडत असेल तर वेलची पूड घालून सरसरीत भिजवून (डोश्याच्या पिठापेक्षा जरा जाडसर) पळीने तव्यावर सोडायचं, हलकंच पसरवायचं. मध्यम आचेवरच चांगलं भाजलं की पलटून दूसरी बाजू भाजायची. तुप लावून पुन्हा दोन्ही बाजु खरपूस होईस्तोवर भाजायच्या. आणी चहासोबत नाहीतर कधी नुसतं कोरडंच खायला घ्यायचं.  लहानपणी आई एकीकडे गुलगुलं बनवायला घ्यायची नी आम्ही भावंड चुलीपुढेच गरम गरम खायला बसायचो. शाळेच्या डब्यात, मित्र-मैत्रिणीला आवडतं म्हणून एखादं जास्तीचं भरुन घ्यायचं. नेहमीच्या चपाती-भाजीच्या डब्यापेक्षा हा जरा वेगळा प्रकार बरा वाटायचा. बनवायलाही सोपा, कमी वेळात होणारा आणी चवीला वेगळा म्हणून मलाही आवडणारा हा पदार्थ अधनं-मधनं मी माझ्या १० महिन्याच्या लेकासाठी बनवते. गुळाच्या चवीमुळे त्यालासूद्धा खुप आवडतं. त्याला खाता यावं म्हणून जरा मऊच ठेवते. @$m!

नाचणीचे लाडू

Image
नाचणीचे लाडू.. लांबून एखाद्या आकर्षक चॉकलेट बॉलसारखा दिसणारा हा पौष्टिक नाचणी लाडू खास ऊन्हाळ्यात बनवण्याचं कारण म्हणजे नाचणीतला थंडावा. शिवाय नाचणीतुन शरीराला कँल्शिअम सूद्धा मिळते, भुक नियंत्रणात राहाते. चवीलाही मस्त. एकूणच अतिशय पौष्टिक अशी ही नाचणी लाडवाच्या रुपाने समोर आली की लहान-मोठे सगळेच आवडीने ते फस्त करतात. पोषणमुल्यांनी भरपूर, जिभेचे चोचले पुरवणारे हे लाडू नक्की करुन बघा. साहित्य: १किलो नाचणी, पिठीसाखर पाव किलो +१छोटी वाटी (अंदाजाने गोड कमी जास्तचं तुमचं प्रमाण), तुप ४०० मिली अंदाजाने कमी जास्त करु शकता), १ वाटी भाजलेला रवा, वेलचीपूड, काजुचे-बदामचे बारीक तुकडे क्रती: नाचणी भाजून दळुन आणा. दळलेले पिठ तुपात निट भाजून घ्या. मग त्यात पिठीसाखर,रवा, वेलचीपूड,काजुचे तुकडे घालून एकजीव करुन लाडू वळायला घ्या. आवश्यक असल्यास लाडु वळताना तुप कोमट करुन मिश्रणात घाला. तयार लाडु थोडा वेळ मोकळ्या हवेत ताटात सुटसुटीत करुन ठेवा मग डब्यात भरुन ठेवा. @$m!