गंपूच्या गोष्टी - लब्बाड नकल्या

लब्बाड नकल्या...

गंपू
वय १९ महिनेलहान मुलं घरातल्या लोकांच, मग हळुहळु बाहेरच्या लोकांचपण अनुकरण करतात. बऱ्याचदा आपल्याला माहितही नसलेले आपलेच बारकावे ही मुलं अचूक टिपतात. आता आमच्या युगचचं घ्या जशीच्या-तशी आमची नक्कल करायला लागलाय.

कालचीच गोष्ट दुपारी त्याचं जेवण झाल्यावर मी माझं ताट वाढून घेतलं. पोटात भर पडली की तो त्याचा एकटाच खेळतो. मग तहान लागली, शु आली तरच त्याला मी हवी असते. तर असाच खेळता खेळता तो देवाच्या खोलीत गेला., तशी मीही माझं ताट घेऊन , देवाच्या खोलीत पटकन डोकावता येईल असा आडोसा शोधून बसले. देव्हाऱ्यात निरांजन लावलेलं होतं. म्हणून तो देवाऱ्ह्यासमोर जाऊन हात जोडून बसला. पप्पा हळु आवाजात प्रार्थना म्हणतात  तशीच कमी आवाजात "आ..भीश्श्..बीज्ज...तका.....तुका.." असली काहीतरी प्रार्थना तोंडातल्या-तोंडात बोलून झाली की हळुच बाहेर डोकावून बघितलं 'आई मला बघत तर नाही ना..'. मग देवाऱ्याच्या एका बाजूने जाऊन कुंकवाच्या करंड्यात बोट बुडवून कपाळावर टिक्का लावला (समोरुन हात पोचला असता पण समोर निरांजन सुरु होतं , त्याने हात भाजतो हे त्याला चांगलंच माहित झालंय) आणी पुरावा मिटविण्यासाठी चड्डीला ती कुंकवाची बोटं पुसली. करंड्याला हात लावला हे आईला कळलं की आईचे धपाटे मिळतात हेही लक्षात होतं म्हणजे..

आता जैजै करून झाला म्हणून तो बाहेर यायला निघाला., पण दरवाज्यापाशी येऊन परत काहीतरी आठवून मागे फिरला. हा परत आत कशासाठी गेला बघावं म्हणून मी ही भिंतीआडून आत डोकावलं, तर अगरबत्तीचं स्टँड हातात घेऊन गोल-गोल फिरवत होता. अगरबत्ती केव्हाच जळून संपलेली, हा रिकाम्याच स्टँडने देवाला ओवाळत होता. ते ठेवल्यावर घंटा वाजवायची राहिली म्हणून तीही एका हातात घेतली. आता घंटा आणी ते अगरबत्तीचं भांड एकत्र काही घेता येईना म्हणून जराशी घंटि वाजवून खाली ठेवली की अगरबत्ती गोल फिरवायची अशी सगळी धडपड सुरु होती.

प्रार्थना बोलला, टिक्का लावला पण पप्पांसारखी अगरबत्ती फिरवून घंटी वाजवायची राहून गेली म्हणून हा प्रपंच. सकाळी त्याचे पप्पा अंघोळ आटोपून देवपूजा करतात तेव्हा ते अगरबत्ती-घंटा घेऊन ऊठले कि हा त्यांच्या मागे-मागे घरभर फिरतो.,तेव्हाचं हे निरीक्षण.

तर हे असं सगळं करून तो दमला असावा म्हणून जरा शांत खाली बसला. आणी मग त्याचं लक्ष देवाच्या खाऊच्या प्लेटकडे गेलं. मी पुजा झाल्यावर त्यातली साखर/शेंगदाणे त्याला भरवते. आज गडबडीत साखर ठेवायची विसरुन गेले. मला वाटले आता हा प्लेट घेऊन माझ्याकडे साखर मागायला येईल आणी मला आयतीच संधी मिळेल त्याला धपटा द्यायला. कारण हजारदा सांगूनही तो देव्हाऱ्याकडे गेला, त्यात कुंकु चड्डीला पुसलं, अगरबत्ती ची राख खोलीभर केली. मार तर मिळायलाच हवा.

अरे पण हा आलाच नाही. तो ती प्लेट देवापुढे धरून काहीतरी करत होता. म्हटलं बघुयात तरी.,पुढे जाऊन हळुच  वाकून बघितलं, त्याने प्लेटमध्ये हात घातला आणी देवबाप्पा कडे बघून, नाक-तोंड एक करुन, थोडक्यात अगदीच गरिब-बिच्चारं तोंड करून, हाताने ईशारा करत सांगितलं "शंपा.." (खाऊ संपला).😂😂😂😂..."आईंग...चक्क देवबाप्पा ला अँडजस्ट करायला सांगतोय..??😕😂"

माझी ईथे हसून पुरेवाट. म्हटलं "धन्य आहात गंपूशेठ.,किती लबाड आहेस तू, तुझा खाऊ द्यायचास ना बाप्पाला..., खुशाल शंपा म्हणून सांगतोयस ते..? तूझ्या राज्यात, देवालाही हवा खाऊन जगावं लागणार बहुतेक". आणखी काही बोलण्याआधीच त्याने माझ्या हातावर तोंडाने "प्पा.." केलं. ही "प्पा" आजकाल रोज दिली जाते.,आईचा मुड बदलून तिच्या धपट्यांपासून स्वतःला वाचवण्यासाठी...

@$m!

Comments

Popular posts from this blog

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

आईची रेसिपी - गुलगुलं

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects