लिमलेट-अंकल..🍬🍬

लिमलेट-अंकल..!


कधी-कधी आर्यन दादा, रिद्धी, सौमय्या, तन्वी दिदी, ओम,साई हे सगळे संध्याकाळी युग सोबत खेळायला घरी येतात. एकदा संध्याकाळी मी सगळ्या बच्चेकंपनीला चॉकलेट्स वाटले. असेच आणले होते. लहान मुलांना असतेच ना आशा खाऊची. तर दुसऱ्या दिवशी रिद्धी खेळायला आली आणी मी कामात होते. ती येऊन मला म्हणते कशी "आंटी अगर आप मुझे चॉकलेट या और कुछ देना चाहती हो तो दे सकते हो". मी हळूच हसले आणी माझ्याकडच्या दोन लिमलेटच्या गोळ्या तीच्या हातावर टेकवल्या. दोन्ही एकदम तोंडात टाकून ती गेली परत खेळायला.

मला त्यावेळी आमच्या लहानपणीची लिमलेटच्या गोळ्यांची आठवण झाली. आमच्या सोसायटीतले एक अंकल नेहमी स्वत:कडे लिमलेटच्या गोळ्या ठेवायचे. ते दिसलेकी आम्ही गोळी हवी म्हणून मागे लागायचो. ते अंकल अभ्यासात खूप हुशार. इंग्रजी, विज्ञानातलं काहीही अडलं की आम्ही अंकलकडे जायचो. आमचा ट्युशनवाला दादा सुद्धा पंधरावी झाल्यावर पुढे काहीतरी शिकत होता तो सुद्धा अडलेलं काही विचारायला अंकलकडे यायचा.

अहो अंकल नाही.., तर ए अंकल म्हणण्याईतपत आपला वाटायचा तो. त्यांचं नाव बऱ्याचवेळा विचारलं आम्ही. "सुब्रह्मण्यम -- अमुक-- तमुक- ढमुक  असं भलं मोठ्ठं नाव सांगायचा. जे आम्हाला कधीच लक्षात नाही राहीलं. ईथे त्याच्या खोलीत एकटाच असायचा तो. कधी कोणाशी भांडण नाही, मारामारी नाही. बिनलग्नाचा होता.  उघड्या अंगावर कायम जाणवं, खाली सफेद धोतर असला वेश करुन कुठल्याशा देवाला जाऊन यायचा दररोज सकाळी. कपाळावर उगाळलेल्या चंदनाच्या दोन पट्ट्या असायच्या त्या दिवसभरात घामाने पुसुन गेल्या की एक टिक्का लावायचा. तो बाजूने गेला कि एक मंद सुवास दरवळायचा. आम्ही विचारलं की म्हणायचा "तुम लोग जैसा आर्टिफिशियल साबुण नही लगाता मैं., चंदन घिसके पुरा बॉडीपर लगानेका., फिर नहानेका., अच्छा खुशबु एकदम natural fragrance आनेका फिर."

ईथे आला तेव्हा हिंदी नव्हतं येत त्याला. त्याची मातृभाषा सोडून ईंग्रजी, फ्रेंच येते म्हणायचा . आमच्यातली द्वाड पोरं अंकलला मराठी कळत नाही म्हणून. "अंकल तू वेडा आहेस ना असं विचारायचीत.?" यावर आम्ही सगळे हसलो की अंकलपण हसायचा आणी त्या पोराच्या डोक्यावरुन हात फिरवून डोक्याचा किस घ्यायचा. पुढे तोडकंमोडकं मराठी-हिंदी शिकला तो. मग त्यावेळी कोणी त्याची अशी टिंगल केली तरीसुद्धा तो रागवायचा नाही उलट शांतपणे " no.. no body is वेडा you all are good people.,सब गॉडके बच्चे हो.. " म्हणायचा.

पुढे आम्ही मोठे झालो तसा अंकल आम्हा मुलींसमोर संकोचल्या सारखा वागायला लागला. तरुण मुली,बायकांचा चुकुन स्पर्श होईल म्हणून स्वतःला वाचवत मार्ग काढून चालायचा. आम्हा मुलांना कुठुनतरी कळलं अंकल मेंटली थोडा आजारी असतो. त्याचा खोलीत राहायचा, खायचा,कपडे लत्त्यांचा खर्च त्याची बहीण करते. आमचा विश्वास च बसेना एवढा हुशार अंकल आणी मानसिक रोगी..? त्याला त्याच्या अती अभ्यासानेच वेड लावलेलं असं कळलं. आमच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून त्याची खोली. खोलीच म्हणावी लागेल कारण घर म्हणावं असं काहीच नव्हतं त्याच्या खोलीत. एक चटई, रग, चादर, आणी चारदोन कपडे एकुलतं एक पांढरं धोतर, कोपऱ्यात कुठलासा देव आणी पुजेच्या चार दोन वस्तू, आत प्लास्टिकचे पाण्याने भरलेले दोन क्यान. ते सुद्धा खाली म्युनिसिपाल्टीच्या नळावरुन भरुन आणलेले., ईथल्या पाणीपट्टीचा खर्च नको म्हणून. किचनमध्ये जुन्या स्टाईलचा स्टोव्ह् आणी एक बाटली रॉकेल एवढंच .कपड्याचा साबण, ब्रशपण नव्हता. एका फुटक्या प्लास्टिक बरणीत कपड्यांची पावडर तेवढी होती. ना लाईट, ना पंखा., घरात गेलं की कोंदट वास मारायचा.  हा विना टिव्ही घरात एकटा बसून राहतो कसा वाटायचं. गोधड्यांच्या खाली दोन जाडजूड पुस्तकं बघितली होती आम्ही.... ईंग्रजीत होती.! अंकल एका मोठ्या कंपनीत लॅबमध्ये कामाला होता म्हणे.

त्याच्याकडे एखादा साधा प्रश्न घेऊन गेलो तरी तो त्या विषयावर खूप गहन माहिती पुरवायचा. त्याचा ऐतिहासिक आणी वैज्ञानिक अभ्यास भरपूर असावा. आणी इंग्रजी वरच त्याचं प्रभुत्व आम्हा चाळकऱ्यांसाठी अभिमानाची गोष्ट होती. पण कधीतरी रात्रीच सगळं शांत झाल्यावर अचानक अंकलच्या घरातून तो एकटाच बडबडत असल्याचे आवाज यायचे. आमच्या आणी त्याच्या घराची एक भिंत कॉमन असल्यामुळे तो समोर बसवून कोणालातरी ईंग्लिश मध्ये काहीतरी समजावून सांगतोय अशी असम्बंध बडबड ऐकू यायची. मग ईकडून आम्ही भिंतीवर काठीने ठकठक केलं की पलीकडला अंकल शांत बसायचा.

आता वय वाढलं तसे डोक्यावर, दाढीवर तुरळक पांढरे केस दिसायला लागलेत पण आजही लहान मुलांना लिमलेटच्या गोळ्या वाटतो. त्याची ती नेहमीची, दाढांसहित सगळे दात दिसणारी मोठी स्माईल देतो.(आईच्या भाषेत विचकी स्माईल). घरातल्या भिंतींचे बऱ्याच ठिकाणी प्लास्टर पडून आतल्या विटा दिसायला लागल्यात. पावसाच्या पाण्याने कुजून झिजलेली लाकडी खिडकी, दरवाजा..,प्लास्टिक चा कागद,चिकटपट्या लावून त्याने स्वतःच दुरुस्त केलंय. घराच्या छपराला असलेल्या पत्र्यावर बरीच भगदाडं पडलीयेत. आधी चांगले पँट-शर्ट घालायचा अधूनमधून..., आता लुंगीवरच जुना एखादा शर्ट चढवून फिरतो. सगळे त्याला वेडा अंकल म्हणतात. पण तो तर मला सगळ्यात हुशार आणी शहाणा वाटला. 'हे विश्वची माझे घर' असल्यासारखं सगळ्यांना आपलं मानून जगणारा. रस्त्यावर च्या कुत्र्या-मांजरालाही गोंजारुन त्यांच्याशी प्रेमाने गप्पा मारणारा शहाणा अंकल.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#गंपू_मिंमा

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

आईची रेसिपी - गुलगुलं