गंपूच मनोगत २

गंपूचं मनोगत २


या आईने ना सगळ्यांना माझी मोदकाची गोष्ट सांगितली ना म्हणून सगळे हसतात मला. उग्गाच मला खादाड आणी हावरट-बिवरट बोलतात. पण मी अजिबात नाहीये हा तसा. उलट कधी कधीतर मला मुडच नसतो जेवायचा. पण ह्या आईला कोण सांगेल.? सारखीच नुसती भाजी-चपाती नाहीतर वरणभात घेऊन मागे लागते माझ्या. मी ना आर्यन दादाच्या घरी जाऊन लपलो, तरी ती शोधून काढते मला. आता नाही आवडत मला असलं जेवण. मला नां  चपाती बरोबर मुरांबा, तूप-साखर, हलवा, शिकरण, बासुंदी, श्रीखंड असं छान-छान सगळं खायला आवडतं.  पण आई मला रागावते नुसती..,बोलते तु खुप गोडखाऊ झालायस, सारखं गोड खाऊन पोटात किडे होतील. मी बिचारा लहान म्हणून असं काहीही बोलतात  मला. असं कधी होतं का.?? पोटात किडे बिडे.? उगाच घाबरवते ना आई. रोज ते ओवा/बडीशेप घातलेलं ईईई... गरमपाणी प्यायला लावते. काल मामा तर आईला म्हणाला "तायडे तुझा पोरगा शेरडीगत शेलकं खायला शिकलाय "  😢. म्हणजे काय ते मला नाही कळलं पण ते ऐकलं आणी आईला अचानक काय झालं काय माहीत लगेच मला हाताला पकडून एका जागी बसवून जबरदस्ती सगळा वरणभात भरवला. खूप-खूप राग आला मला दोघांचा.😫

आई फारच badgirl सारखी वागते आता. मला कधीकधी धमकी सुद्धा देते- डॉक्टर काकांकडे नेईन, ईंजेक्शनच द्यायला सांगेन म्हणून. तसं ते खोटं-खोटं असतं मी मनावर नाही घेत. पण परवा तर ती खरंच डॉक्टर कडे घेऊन गेली मला. दोन-दोन ईंजेक्शन दिले उगाच. मी कित्ती रडलो माहितेय. त्यादिवशी सकाळीच माझे लाड करत म्हणाली होती मला "बाळ माझं मोठं झालय आता, दीड वर्षांचा झाला तू शोना". मला वाटले मी परत मोठा झालोय म्हणजे बड्डे करणार माझा. मला खूप सारा केक,आईसक्रीम खायला मिळणार. पण हिने तर मला ईंजेक्शन दिले . किती दुखलं मला. जागेवरून हलता सुद्धा येत नव्हतं. डोकं ,हात,सगळं 'हाह्' (भाजत होतं) वाटत होतं. आमच्या इथल्या चिंटू (कुत्रा) च्या पायाला बाऊ झालेला तेव्हा तो चालायचा ना तसाच मी चालत होतो. आईतर खूपच दुष्ट वागत होती, सारखा तो डेंजर बर्फ आणून पायाला लावायची. जोरात भाजतो तो बर्फ लावल्यावर, मी चिडून तिला चावलो जोरात आणी कट्टी च घेतली तिच्याशी  तरीसुद्धा जबरदस्ती मला ओढत घरात फेऱ्या मारायला लावल्या. नाहीतर पाय आखडेल म्हणे. नंतर बिचारा मी नुसतं गरिबागत ऊशीवर डोकं ठेऊन झोपलो होतो ., म्हणजे असं आईच पप्पांना फोनवर सांगत होती ते मी ऐकलं. तर मी तसा पडून होतो इतक्यात मला शी-शी झाली म्हणून मी आईला "यायी" "दाई" म्हणून एवढ्या हाका मारल्या पण आई नुसतीच "हो आले...रे" "थांब रे जरा शोन्या" करत परत-परत तिथेच थांबायची. कित्तीतरी वेळ झाला तरी मी तसाच ऊशीवर डोकं ठेवून भुंडु वर करुन बसलो होतो. मग आल्यावर बघितलं., मी शी-शी करून ठेवलीये तरी मला नाही ओरडली. कारण मी आजारी होतो ना. उलट "अरे देवा तुला शी-शी झाली म्हणून बोलवत होतास.? सॉरी रे बबड्या,मला वाटलं तुला दुखतंय म्हणून मला हाका मारतोयस." म्हणाली आणी पापु घेतला माझा. मला ना खरंच खूप खूप खुपच आवडली तेव्हा आई.

@$m!

Comments

Popular posts from this blog

#गंपू_मिंमा

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

आईची रेसिपी - गुलगुलं