सेलिब्रेशन

💁 सेलिब्रेशन

आज लग्नाला सहा वर्ष झालीत. जोडीने सिक्सर मारलाय असं म्हणू., बाकी सिल्वर जुबली, गोल्डन जुबली होईल तेव्हा होईल. पण सिक्सर सेलिब्रेशनची सुरुवात कालपासुनच झालीये.,रविवार होता म्हणूनच बहुधा.

"खाऊगल्लीमे जायेंगे हम🙌" म्हणता-म्हणता तिथल्या ट्राफिकच्या नुसत्या विचारानेच ईतकं दमायला झालं की खाऊगल्लीकडे निघालेली आमची गाडी ईथेच बाजूच्या उडपी हॉटेलाकडे वळली. तिथे उभ्याने खाणार.., तो ईथे खाल्ला ईडली-डोसा. सेल्फी विथ डोसा घेता-घेता राहिला. कारण ठरला आमचा बाळकृष्ण.,याला खाण्याआधी सांडण्याचीच घाई. त्याच्या कृपेनेच माझ्या पिवळ्या-धम्मक ड्रेसवर तितकाच धम्मक डाग लेवून कालच्या दिवसाची सांगता झाली.

 रात्री परतल्यावर अगदी ठरवून माझे डोळे..,छताला, टिव्हीला आणी मोबाईलला कितीतरी वेळ टांगले तरीही  बाराचा टोला स्वप्नातच पडला. त्यांचीही घोरतपस्या सुरुच असणारेय. त्यामुळे शुभेच्छांची देवाणघेवाण  सकाळीच झाली.

सकाळी स्वहस्ते उटणं बनवून घरातल्या दोन्ही बाळांच्या अंघोळी आटोपल्या. देवघरातली चंदन-फुलांची सुवासिक दरवळ घरभर दाटली..,म्हटलं सण वाटला पाहिजे आज.

 मग नवरदेव ऑफिसात आणी नवरीबाई स्वयंपाकात. संध्याकाळी आपण काहीतरी सर्प्राराईज द्यायचंच म्हणून कालच लावलेल्या दह्याचं लोणी काढलं. ताज्याच लोण्याचा केक केला. लोण्यासारखाच मऊ-लुसलुशीत केक.
आह्हा्..!
प्रेमच ते..सहा वर्ष जुन्या बायकोचे असले म्हणून काय झाले..? आजही या लोण्याईतकेच ताजे आहे..!

संध्याकाळी नवरेबुवा बुलेटवरुन वाजतगाजत आले. की केककटिंग आणी घासभरवणं करु ठरवलं.,तर या बोक्याने केकवर पंजा मारला. 'बस्स एक पंजा और केक करलो मुठ्ठीमे।' पंजा मारलेल्या केकचाच घास-घास भरवला मग दोघांनी. एव्हाना केकसाठी बाळराजाच्या टुणटुण उड्या मारुन झालेल्या. दोघेच खातायत.., मला कोणी देईना म्हणून बसले रुसुन. आधीच फुगलेल्या गालात दोन बाजूला दोन केकचे घास कोंबून भरल्यावर ते अजुनच फूगले.

केक झाला, लोणी संपलं, थालीपीठ-उसळीचा डिनरही उरकला आता उरलं फक्त ताक... अधमुरंसं..! ठेवलं तेही मुरवत. कुणी तरी म्हटलंच आहे "अग्गो मुरल्याशिवाय का कळायचा हा संसार..!" असो उद्या मुरलेल्या ताकाची कढी आणी मुरलेल्या संसाराची गोडी चाखू जोडीनंच. आणी करु सातव्या वर्षात पदार्पण..!
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

पाल........

#माझीखवय्येगिरी_मुद्दाभाजी