गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

 युग(गंपू)
२० महिने



लहान मुलांच एक बरं असतं..,त्यांच्यातल्या त्यांच्यात फार पटकन मैत्री होते! अगदी नाव-गाव माहिती नसेल तरीही, समोरचा त्यांच्या 'लहान' या कॅटेगरीत बसला की झाली मैत्री. युगने सुद्धा आपल्या चिंटुर-पिंटुर मित्र-मैत्रीणींच एक मित्रमंडळ बनवलंय. त्यात सगळ्यामध्ये कच्चा लिंबू म्हणून याचीच दादागिरी. त्यांच्या दंग्याला कंटाळून कोणा एकालाही ओरडा दिला तरी सगळचे दोन मिनिटांच मौन पाळल्या सारखं शांत बसतात. शिवाय ओरडणाऱ्या व्यक्तीला आमच्या धुसफुस्या युगच्या जळजळीत कटाक्षाचा सामनाही करावा लागतो. युग आपल्या मित्रांच्या,टिव्हीतल्या लहान मुलांच्या आणी खेळण्यांच्याही बाबतीत बराच प्रोटेक्टीव्ह वगैरे वागतो.  असं म्हणतात की लहानमुलांची भावनिक नाळ एकमेकांशी जुळलेली असते. याच अंगाचं एक उदाहरण/ एक किस्सा.

मी याआधीही सांगितले त्याप्रमाणे युगला टिव्हीवरल्या जाहिराती आणी मराठी गाण्यांचं प्रचंड वेड. त्यात आता कार्टून्स, बेबी-राईम्सचे व्हिडिओज आणी लहान मुलांचे चित्रपटसुद्धा ऍड झालेत. कालच मी आणी 'युग', मराठी चैनलवर 'महेश कोठारें'यांचा 'छकुला' बघत होतो. त्यातला 'आदिनाथ' 'युग'ला भलताच आवडलेला दिसत होता. म्हणजे त्याच्या एकूण हालचाली पाहून मलातरी हेच वाटलं. तिकडे त्या आदिने लक्ष्मीकांतजी उर्फ लक्ष्याला आणी अविनाशजींना आईच्या पाकिटचोरीची शिक्षा द्यायचा चंग बांधलेला असतो. आदीनाथ, लक्ष्या,अविनाश या सगळ्यांची बराच वेळ पळापळ चाललेली असते. ती पाहून युगसुद्धा घरातल्या घरात सैरावैरा पळायला लागला. पळता-पळता मधेमधे येणारं खेळणं, पलंगावरल्या उश्या, दाराकडील पायपुसणं एक-एक करून आईच्या अंगावर फेकायला लागला. कॅरेक्टर जास्तच मनावर घेतलं की असाच चेव चढतो याला. आदीनाथ ची कोलांटीउडी बघून यानेही आपलं कौशल्य पलंगावर चढून आजमावलं. फरशीवर डोकं आपटतं हे आताशा कळून चुकलंय म्हणा.

मग फेव्हिकॉलने चिकटलेले ते दोघे चोर आट्या-पाट्या खेळताना बघून युगच्या खेळात आईलाही सामील व्हावं लागतं. कधीतरी रडु थांबावं म्हणून पाठीवर लेकरालाच कोकरु घेऊन कुक्कुचीक्काईss...केलेलं नेमकं त्याला आज आठवतं. लांबून पळत येऊन धपाक् आईच्या पाठीवर आदळून तिच्या गळ्याभोवती विळखा घालून हे महाशय चिकटून बसतात. आणी आई बिचारी अचानक झालेल्या कोकरुहल्याने गडबडून जाते. मग स्वतःला कसंबसं सावरुन पटकन त्याच्या खेळात सामील होते. पिक्चरची स्टोरी पुढे-पुढे सरकते तशी-तशी आदिनाथ च्या सगळ्या धमाल-मस्तीची पुनुरावृत्ती युगच्या घरीही झालेली असते.

पुढे मग कहाणीतलं रडकं वळण आलं तशी स्वारी गुपचुप येऊन आईच्या मांडीवर बसली. आदीनाथ चा तो रडका क्लोज-अप सीन बघून ईकडे हळूहळू आमच्या छकुल्याची स्माईली उलटी व्हायला लागली. डोळ्यांचा तलाव तुडुंब भरला. आणी पिक्चरमधल्या खुंटीवर अडकलेल्या आपल्या छकुल्या मित्रासाठी गंपू टिव्हीकडे धावला. टिव्हीतल्या आदिनाथ ला हात लावून 'ज्जे...ए..ए..ज्जे' ('ये इकडे ये' किंवा 'हे घे' या अर्थाने तो हे शब्द नेहमी वापरतो) असं म्हणत रडायला लागला. त्याला असं बघून आता मला क्षणभर काही सुचेचना. रडू थांबावं म्हणून मग मी चैनेलच बदललं. तर नेमकं त्याच्या आवडीचं झिंगाट गाणं लागलेलं. रडू येत होतं पण गाण्याच्या तालावर नाचायचं पण होतं. ईथे त्याचा भावनिक गोंधळ झाला हे स्पष्ट दिसत होतं चेहऱ्यावर. शेवटी डोळे पुसुन गंपुसाहेब पलंगावर चढले. त्याची झिंगाट स्टेपसाठीची बाला डान्स पोझीशन घेतली आणी सुरु केलं ....
" ए झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंग झिंगाट्..."
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬