गंपूच्या गोष्टी - हट्टी गंपू

गंपूच्या गोष्टी 
युग(गंपू)
वय दीड वर्षपोट्ट्या सगळ्यांना दमात घेतोय हल्ली. माझ्याच 
मोबाईल वर येणारे फोन मी त्याच्यापासून चोरून उचलते. म्हणजे ह्याच्या पप्पांचा फोन (video call) आला की तो फक्त त्यालाच द्यायचा. स्वतः बोलणार नाहीच पण नुसता फोन उलटा-पालटा करुन आपटून-आपटून पप्पा मोबाईल मधून बाहेर येतायत का बघतो. आणी मग कंटाळून व्हिडीओतल्या पप्पांना ओरबाडेलच काय, पापा काय देईल. आपण फोनला जरा हात लावला की हा रडायला सुरु.

तसं त्याला रडायला कुठलंही कारण पुरतं.
मी गाणं गाते!..,
आरशासमोर, स्वयंपाकघरात, एकटी असताना, देवपूजा करताना,सहजच, कधी स्वत:साठी कधी माझ्याच माणसांसाठी. गाण्याची शास्त्रीय बाजु असेल थोडी कमकुवत पण गाणं गाण्यासारखंच वाटेल ईतकं बरं नक्कीच गाते. पण गंपूसमोर गायचं असेल तर त्याच्याच बुद्धीकोशात फिट्ट बसलेलं एखादं किलबिल गीत किंवा मग ढिंच्याक गाणं (हा माझा प्रांत नव्हे तरीही) गायचं. त्याच्या समोर तुम्ही तुमच्या आवडीचा एखादा अभंग किंवा 'रैना बीती जाये..' टाईप गायला घेतलंत तर हा पोरगा धाय मोकलून रडायला लागतो. आता त्याचं हे रडणं गाण्याचा भावार्थ समजून आलेलं असतं की गायिकेच्या गाण्याला दिलेली दाद असते हाही एक प्रश्नच. स्वतःच्याच घरी आवडीचं गायची सोयसुद्धा नाही राहीली आता. असो बालहट्ट कोणाला चुकलाय..!

घरचे तर घरचे पण हा तर बाहेरच्यांना पण हट्टुन मुठीत ठेवायला बघतोय. शेजारच्या मुली "रिंगा रिंगा रोझेझ...."म्हणत ठराविक पद्धतीने फेर धरत खेळत असतात तिथे हा मधेच जाऊन उड्या मारतो. त्या बिचाऱ्या सारख्या जागा बदलत खेळतात तर हा दरवेळी 'मुलीत मुलगा लांबोडा' बनूण शिरतो. बरं ह्याला त्यांच्यासारखं धड फेर धरायलाही जमेना की त्यांची गती ह्याच्या गतीसोबत मेळ खाईना. नुसताच सावळा गोंधळ. शेवटी  त्या मुली ह्याला कृष्ण म्हणून मध्ये उभा करतात आणी चारीबाजुंनी फेर धरुन मार म्हणतात उड्या पाहिजे तेवढ्या. असो मुली जन्मतःच समजूतदार असतात त्यापुढे बालहट्ट तरी काय चीज आहे.!☺
@$m!

Comments

Popular posts from this blog

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

आईची रेसिपी - गुलगुलं

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects