मामाचं गाव- भाग १

मामाचं गाव- भाग १

लहानपणी उन्हाळी सूट्टीत मामाच्या गावी जायची मजा जवळजवळ प्रत्येक वर्षी अनूभवलीये. ते दिवस आठवले कि पून्हा लहान ह्वावेसे वाटते. कसले भारी होते ते दिवस..!
वसंतगडाच्या पायथ्याशी वसलेलं माझ्या मामाचं गाव 'तळबीड'. कूठे काळसर राखट तर कूठे तांबडी माती असलेलं. गावात एंट्री करतानाच हंबीरराव मोहीत्यांची समाधी आणी एक मोठं राममंदिर आहे. त्याच्या बाजूलाच जुनं दगडी देऊळ पण होतं आधी. मामाचं घर गडाच्या पायथ्यापासून पाच मिनिटांवर आहे. आम्ही जेव्हा लहानपणी गावी जायचो तेव्हा मामाचं घर मातीचं होतं. पूढच्या अंगणात उंबराचं झाड आणी त्या समोर तुळशी वृंदावन. मागच्या अंगणात चिंचेच (खोबरी चिंच अस काय तरी म्हणायचो) नी शेवग्याचं झाड होतं. या खेरीज चाफा, मोगरा, कर्दळ, डाळींब, पेरू, लिंबू ही झाडं पण होती. शेवग्याला लागूनच एक छोटसं छप्पर आणी छपराशेजारीच म्हशींचा गोठा. या शिवाय गवताच्या ताट्यांपासून बनवलेलं 'न्हानीघर' (बाथरूम)ही होतच. हा एवढा सगळा 'गोतावळा' असायचा ह्या घराचा..!! 'वैभव' म्हणा हवं तर या घराचं..!! आता सिमेंटच दोन मजली घर बांधलय तिथे. म्हशी,उंबर,चिंच भूतकाळात जमा झालेत..!! बाकीच्या गोष्टी आहेत अजूनही तशाच. घराप्रमाणेच गावातही हळूहळू खूप सारे बदल झालेत. गडाच्या पायथ्याशी एक मराठी शाळा बांधली गेलीये. पायवाटेचे पक्क्या रस्त्यात रूपांतर झालेय. जून्या दगडी देवळाची जागा भव्य मंदिराने घेतलीयं.., जागोजागी दूकाने-मेडिकल्स आलीत. गावातली आत्ताची पिढी तर कराड-साताऱ्याच्या इंग्रजी शाळेतच जातेय. न्यायला, सोडायला शाळेच्या बसेस् उपलब्ध झाल्यात. खूप खूप बदललंय माझ्या मामाचं गाव..!

मुंबईहून राञभर प्रवास करून सकाळी उजडायच्या आतच सातारला पोहोचायचो. साताऱ्यात पोहोचण्याआधीच आम्ही जागे व्हायचो. खरंतर राञभर झोपायचं नाही असं कितीही ठरवल तरी झोप यायचीच. मुंबईतल्या दमट वातावरणातून बाहेर पडून थंडगार वाऱ्याची झूळूक आली की लगेच झोप लागायची. सकाळपर्यंत थंडी वाढायची आणी आमची झोप उडायची. साताऱ्यापासूनचा गावापर्यंतचा रस्ता माझा खास आवडीचा असायचा. रस्त्याशेजारून पळणारी हिरवळ, थंडगार वारा आणी नजीकच्या गावातल्या पेटणाऱ्या चूलींचा धूर, कोंबड्याच आरवणं.., हे सगळं मिस्स होऊ नये असा माझा प्रयत्न नेहमीच असायचा पण मध्येच विटांच्या भट्टीचा वास गाडीच्या खिडक्या बंद करायला भाग पाडायचा..! गावात पोहोचलो की पांढरा सदरा, पायजमा नी गांधी टोपी किंवा सदरा-धोतर-फेटा परिधान केलेले लोक बघून मस्त वाटायचं..! गावी आल्याच फिलींग यायच..!

 देवळापासून पूढे घरापर्यंत चालत जावे लागे. खाली उतरल्यावर ज्या पायवाटेने घरापर्यंत जायचो तिथे रस्त्यात खूप ओळखीचे लोक भेटायचे. विचारपूस करायचे "कसायं मुंबईकर बरायं का?" कोणी गायी म्हशींच्या धारा काढताना दिसे कोणी शेणाची पाटी घेऊन जाताना दिसे. मध्येच कोंबड्याही रस्ता ओलांडायला यायच्या. बरीचशी कामात गडलेली डोकी वर निघायची नी आपसात कुजबुजायची "ही मुंबयची स्वारी कूणाकडली?" "भगवानकाकांच्या घरचीये, धाकटी (माझी आई) असतेय ना मुंबयला??". (माझ्या आजोबांचे नाव 'भगवानराव' त्याना सगळे भगवानकाकाच म्हणायचे). आईला धरून ही एकूण चार भावंडं. त्यापैकी आई च फक्त मुंबईला असायची. अधूनमधून आम्हाला ती तिच्या लहानपणीचे किस्से सांगायची. तिच्या बोलण्यातून ती मावशीला आणी मामांना खूप मिस्स करतेय हे जाणवायचं. आणी म्हणूनच बहूतेक या उन्हाळी सूट्टीची उत्सुकता आमच्याइतकीच तिलाही असायची.

पायवाटेने चालताना पूढे मामाचं घर दिसलं की आम्ही भावंड पळत घरापाशी जायचो. 'आज्जी-आजोबा' अशा हाका मारतच अंगणात जायचो मग आमची वाट बघत बसलेली आज्जी किंवा मामी घाई करत हातात भाकरतूकडा आणी पाण्याचा तांब्या घेऊन यायची. घरात शिरलेल्या आम्हाला परत घराबाहेर हाकलायची आणी उंबरठ्याबाहेर उभे करून तूकडा ओवाळून टाकायची.
 "काय ग आई ही आज्जी..??, एवढ्या दिवसांनी इतक्या लांबून आलोय तर आम्हाला घट्ट मिठीत घ्यायचं सोडून काय करतेय ही..??" असं बोलत आमचे धाकटे बंधूराज नाक आणी तोंडाचा एकच चंबू करून आधी आईकडे मग आजीकडे एक रागीट कटाक्ष टाकायचे..! पण घरातलं लाडकं शेंडेफळ असल्याने कोणी त्याला फारसे रागवायचे नाही.

आत गेल्या गेल्या आज्जीची मऊमऊ पप्पी मिळायची.!. मग एक एक करून  अंघोळी साठी नंबर लावायचो.

क्रमश:....

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬