गंपूच्या गोष्टी - गंपूचं मनोगत (भाग१)

गंपूच्या गोष्टी
वय १७ महिने

गंपूचं मनोगत- भाग १

या आई-पप्पांना ना काही कळतंच नाही, नुसतं मला ओरडतच असतात. मी तरी कित्ती गुणी बाळासारखा वागतो, आईला पप्पांना कित्ती मदत करतो माहितेय का..? तरी सुद्धा नेहमी मला ओरडाच बसतो.

एकदा ना मला खुप-खुप भूक लागली होती. तर मी स्वयंपाकघरात गेलो. आई कामात होती.,नेहमीच असते. मी आता मोठा झाल्यापासून माझ्यासाठी वेळच नसतो तिच्याकडे म्हणून माझा मीच खाऊ शोधला, किसलेल्या नारळाचं ताट तिथेच खाली ठेवलेलं तिने, मी फक्त थोडसंच, दोन मुठी खोबर घेतलं आणी बाहेर आलो, खाताना एकदम थोडुसंं सांडलं, आता मी छोटा बाबु आहे ना मग खाऊ खाताना सांडतो कधीतरी. पण मी खाली सांडलेला खाऊ अज्जिबात उचलून खाल्ला नाही. आई बोलते खाली सांडलेला खाऊ शी-शी झालेला असतो. मग मला अजून खाऊ पाहिजे होता. मी परत आत खोबरं आणायला गेलो तर आईने ताट उचलून कट्ट्यावर ठेवलं. मी कट्ट्यावरचं ताट ओढायला गेलो आणी त्या ताटाने पटकन उडीच मारली. ते धाssडकन् खाली पडलं. सगळं खोबरं खाली सांडलं. कित्ती कित्ती ओरडली मला आई.😭😭😭

मला खूपच रडू आलं म्हणून मी तिला मिठी मारली तरी तिने मला उचलून सुद्धा नाही घेतलं. आणी ती ते शीशी झालेलं खोबरं ताटात परत भरत होती. मी बोललो तिला खाली सांडलेलं नको घेऊ पण तिला माझी भाषा कळतच नाही कधी. मी एवढा लहान तरी शिकलो तीची भाषा मग तिने पण नको का शिकायला माझी भाषा? आता मी हुशारच आहे म्हणून जरा लवकर शिकलो. तिला थोडा वेळ लागेल पण शिकेल ना हळुहळु. नाही शिकली तर उगाच कम्युनिकेशन गॅप होईल ना आमच्यात..? एकतर ती आहे नाईनटीज् ची आणी मी मिस्टर २०१६..., It's a big generation gap you know.

त्यादिवशी पप्पा पण मला रागावले.., मी पाण्याच्या कळशीत हात घातला म्हणून. मला तहान लागली होती हो, म्हणून मी पाणी प्यायला गेलेलो. मला माहितेय आई माझ्यासाठी एका छोटुशा कळशीत पाणी भरुन ठेवते. ते पाणी फक्त मलाच देते ती. उगाच एवढ्याशा कामासाठी तिला कशाला डिस्टर्ब करु म्हणून मीच आधी कळशीवरचं झाकण काढून नीट बेडवरती नेऊन ठेवलं मग ग्लास कळशीत जातच नव्हता म्हणून कळशीतलं पाणी हातानेच काढत होतो. नेमकं तेवढंच पप्पांनी बघितलं आणी मला ओरडले.

आईने लगेचच मला माझ्या फेव्हरेट ग्लासातून पाणी आणून दिलं. मी आता छोट्या बाळासारखं बाटलीतून पाणी नाही हा पित. I am a big boy now and also I am very responsible person ☺. म्हणूनच मला आठवलं मगाशी कळशीवरचं झाकण लावायचं राहून गेलय. मी फक्त तेवढंच करायला किचनमध्ये गेलो. तरी पप्पा लगेच माझ्या मागून तिथे आले. मला गणपती बाप्पा सारखं उचलून घेऊन हॉलमधल्या बेडवर आणून टाकलं. बोलले "आता खबरदार इथुन हललास तर..". मलातर  रडुच आलं खुप, तरीपण मी तेव्हा हळुहळु मनातल्या मनात रडत होतो.😢😢 पण कधीकधी मनातला रडायचा आवाज थोडासा येतोच ना बाहेर..?
क्रमशः......
@$m!

Comments

Popular posts from this blog

आईची रेसिपी - गुलगुलं

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

माझी खवय्येगिरी - मसालेदार शाही खजाना/Shahi chat