पाल........

पाल.......

भीती मनात असतेच नेहमी पण जोवर डोळ्यांना दिसत नाही तोवर आपण नाहीच घाबरत. आज दिसली मला ती स्वयंपाक घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात. तिचे चमचमणारे डोळे माझ्यावरच रोखलेले. राखट पिवळसर,शेवाळी रंगाचा तो बुळबुळीत प्रकार पाहून शिसारीच आली मला.

पावसाचे दिवस, लाईट्स गेलेत. बाहेर मळभ दाटून आलेलं. भर दिवसा घरात काळाकुट्ट अंधार भरुन राहिल्या सारखा. मस्त पांघरून घेऊन गुडुप झोपावंसं कितीही वाटलं तरी आजची दिवसाभरातली कामं करणं भाग आहे. खिडक्या दरवाजे उघडून घरात प्रकाश झाला कि कंटाळा जाईल आपोआप म्हणून खिडकी उघडायला गेले तर समोरच ही बया. तिला बघून झोपच उडाली. आज तर सकाळपासून खिडकी उघडलीच नव्हती. म्हणजे कालच दिवसाभरात कधी तरी एन्ट्री झाली असणार या मॅडमची. रात्री घरभर फिरून मग ही जागा लपण्यासाठी फायनल केली असणार. असो पण आता दर्शन दिलय म्हटल्यावर तिला तिथून हुसकावून लावायची जबाबदारी माझीच. स्वंयपाक करतानाच पटकन पडली खाली गॅसवर तर प्रॉब्लेम.

खिडकीचं दार उघडून हातात झाडू घेऊन तिला हाकलवायचा कार्यक्रम सुरु केला. पण ती ढिम्म् हलेल तर शप्पथ. जरावेळाने सरपटत थोडं पुढे येऊन मान वर उचलून गळ्यातले गलगंड हलवून, शेपटी वळवळुन मला खुनशी नजरेनं पहायला लागली. जोरात चुक् चुक् चुक् करत मला आव्हान दिलं. मी तिला झाडूत पकडून खिडकीतून बाहेर टाकावं म्हणून प्रयत्न केला. तशी तिने झाडूवरच टुणकन उडी मारुन सळसळ करत माझ्याकडे यायला लागली. घाबरून झाडू माझ्या हातातून गळून पडला. आणी मी  बाहेरच्या रूमकडे पळाले. ती झाडूवरुन घसरुन किचन सिंकमध्ये पडली. आता तिकडे सिंकमध्ये ती उड्या मारत होती आणी ईकडे तिच्यापासून दहा फुटांवर घाबरून थरथरत मी ही उड्या मारायला लागले. मागे एकदा असाच प्रकार घडलेला. सकाळचा डबा बनवायला स्वयंपाक घरात गेले तर तिथे पाल. अहोंना उठवून पाल घालवायला सांगितले तेव्हा ती पळत पळत माझ्या पायाकडे आली . मला घाबरून रडू कोसळले आणी मला असं रडताना बघून अहोंना हसू फुटलेलं. आज तर एकटीच होते मी.

जरा वेळाने थोडी हिम्मत करून झाडू सिंकमध्ये ढकलला तिला बाहेर येता यावं म्हणून. तशी ती वेगाने सळसळत झाडूवर चढली. आणी कट्यावरुन खाली जमीनीवर पडली. मी जवळपास किंचाळतच धूम ठोकली. ते डायरेक्ट  हॉलमधल्या बेडवर जाऊन उभी राहिले. ती घाबरून टॉयलेटमध्ये पळाली. मग मी धीर करुन गेले टॉयलेटकडे. ती भिंतीवर चिकटून शेपटी हलवत होती. हळुच टॉयलेट ची खिडकी उघडून तिला तिथून हुसकावून लावलं. आणी काचा लावून मग दरवाजा बंद केला.

हुश्श्श्श सुटले एकदाचे. किती दमवलं त्या पालीने. या सगळ्या गोंधळात स्वयंपाकाचे तीन-तेरा वाजलेत. आणी फायनली खिचडीभातावर दुपारचं जेवण आटोपलं. टॉयलेटमध्ये एक नजर टाकावी म्हणून गेले. तर बाई खिडकीच्या काचेवरच ठाण मांडून बसल्यात. 😣😣

@$m!

Comments

Popular posts from this blog

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

आईची रेसिपी - गुलगुलं

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects