गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड


गंपू
वय १४ महिने

माझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे  शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत. 
आणी मग मी त्याला विचारलं "अरे तू काय Hippopotamus आहेस का ?"
तर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं'!, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते  निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला! म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन  त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच. 

'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्णवेड्या गोपी जशा त्याच्या पाव्याचा मंजुळ स्वर कानी पडला की देहभान विसरून, हातातली कामं तशीच टाकून त्या आवाजाच्या दिशेने धावत निघायच्या तसाच हा जाहिरातीं चा आवाज ऐकला टिव्ही कडे पळत सुटतो. मला तर प्रश्न च पडतो नेहमी 'आता ह्या एवढ्याशा मुलाला कसं बरं कळतं जाहिरात सुरु झाली ते..??'

जाहिराती इतका टक लावून बघतो कि त्या वेळी त्याला दगडभात जरी खायला घातला तरी तो चवीने खाईल. मीही त्याच्या या वेडाचा पुरेपूर फायदा करुन घेते मग. म्हणजे खाण्यापिण्याचे त्याचे खुप नखरे आहेत(आधी नव्हते पण आता खुप आहेत) म्हणून त्याच्यासाठी खास जाहिरातींचच चँनल लावून समोर बसवला कि मला हवं ते सगळं पौष्टिक त्याच्या पोटात ढकलता येतं. पण तेवढ्यासाठी मला दिवसभर त्याच्या त्या स्लीम-फिट-बेल्ट, कब्ज-अँसिडीटी चूर्ण आणी कालीसे गोरी होने का उपाय टाईपच्या जाहिराती बघाव्या लागतात. त्यातल्या त्यात लहान मुलांच्या जाहिराती लागल्या कि जरा बरं वाटतं, गंपू त्या लहान मुलांकडे बघत त्याच्यासारखंच नाचायला लागतो.ते टिव्हितलं बाळ त्याच्याशीच खेळत असल्यासारखं तो हातवारे करतो.
मी आपली डोळेभरुन त्याच्या बाळलीला बघत एन्जॉय करते.

@$m!

Comments

Popular posts from this blog

माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

आईची रेसिपी - गुलगुलं

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects