माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...."आई"

#जागतिक_महिला_दिनानिमित्त

#माझ्या_जीवनावर_सर्वाधिक_प्रभाव_टाकणारी_स्त्री...

"माझी आई"

आजोबांची लाडकी 'शोभनी'.कागदोपत्री 'शोभा' असलेल्या तिनेही ते नाव आणी तो हक्क फक्त तिच्या वडिलांसाठी खास राखीव ठेवलेला. बाजी-मोहित्यांच्या गावच्या ऐसपैस घरात वाढलेली माझी आई मुंबईतल्या या खुराड्यात कशी रुळली तिचं तिलाच ठाऊक पण आली तेव्हा या टिचभर जागेतल्या पत्र्याच्या खोपट्यालाही घरपण आणलं तिने. शिवणकाम, भरतकाम, विणकाम शिकली होती. याच कोशल्याचा पुरेपूर उपयोग केला तिने. लहानपणी माझ्यासाठी कितीतरी प्रकारची झबली, पेटीकोट शिवले. तिने विणलेलं गुलाबी रंगाचं स्वेटर-कानटोपी..,, माझ्यानंतर माझ्या भावंडांनीही वापरलं. मग हळुहळु वस्तीतल्या आजुबाजूच्या लोकांकडूनही कपड्यांची कामं तिला मिळायला लागली. तेवढाच संसाराला हातभार म्हणून तीही अगदी हौसेने करायची. एक कला जोपासण्याचं साधन म्हणून बघायची. कापड कापून उरलेल्या चिंध्या सुद्धा सांभाळून ठेवायची. पण त्या ठेवताना.., कुठे कशासाठी वापरायच्या हे तिचं-तिचं आधीच ठरलेलं असायचं. मग त्याची कुठे दुपटीच शिव, कुठे पँचवर्कवाले पडदे, झालरीवालं उशीचं कव्हर, कुणासाठी आंगडं-टोपडं असलं काय नी काय करत बसायची. एक born fashion designer. सगळं अगदी पुरवून-सांभाळून वापरायची. आमच्या तिघांच्याही शाळा, अभ्यास, डबे, जेवणं.,असं चाकोरीबद्ध आयुष्य जगताना हाच काय तो विरंगुळा होता तिच्याकडे.

पुढे याच शिवणकामाला पोटापाण्यासाठी वापरात आणलं तिने. मुंबईतील हिंदुस्थान मिल (कापडगिरणी) बंद पडली आणी पप्पांची नोकरी गेली. फंडाची अर्धी रक्कम मिळाली. आयुष्यात ईतका मोठा आकडा पहिल्यांदाच स्वतःच्या नावावर पाहिला आणी आजवर गरिबीत दिवस काढलेल्या बापाला आकाश ठेंगणे झाले. बायकोला दागदागिने आणी ते सुरक्षित ठेवायला घरात एक मजबूत लोखंडी कपाट आलं. कधी नव्हे ती या दिवाळीला बायको-पोरांना जरा महागड्या कपड्यांची खरेदी झाली. आता उरलेल्या पैसा बँकेत टाकून व्याजावर बसून खायचं तर बँक बुडाल्याची खबर आली. पायाखालची जमीनच सरकली. आता सगळं संपलं म्हणत पप्पा गपकन् खाली बसले. श्रीमंती आली म्हणता-म्हणता अचानक हे कायतरीच ओढवलं. डोळ्यांसमोरचा रस्ताच दिसेनासा झाला. कष्टाची कमाई अशी बुडाली हा मानसिक आघात ईतका तीव्र होता की मला आता आयुष्यात कधीच काहीच जमणार नाही अशी हाय खाऊन पुढे दोन-तीन वर्ष ते घरीच बसून राहिले.

घरातला कर्ता असा कोलमडेल आणी माझ्या वर अचानक सगळी जवाबदारी येऊन पडेल हे अनपेक्षित होतं आईला. आमच्या शाळेची फी थकायला लागली तसा या दोन वर्षात घरातला एकेक दागिना आधी गहाण पडला मग विकला गेला. एक मंगळसुत्रच काय ते दोनदा गहाण पडून सुद्धा परत सोडवलं तिने.,सौभाग्याचा दागिना म्हणून. एक लिटर दुधाचा रतीब पाव लिटर वर आला. पोराबाळांची उपासमार होतेय हे बघवलं नाही गेलं आणी खूप रडली ती. कोणाकडून मागून खाणं स्वाभिमान दुखावणारं होतं तिच्यासाठी त्यामुळे इथली कणभरही बातमी माहेरी पोचू दिली नाही. कंबर कसली आणी कामाला लागली. आधी शिवणकाम करुन महिना जेमतेम भागत होता.,आता तिने घरीच एक-दोन लघुउद्योग करायला घेतले. आम्ही मुलं कोवळ्या वयातच जाणती झालो. शाळा-अभ्यास सांभाळून तिच्या कामात मदत करायला लागलो. परिस्थितीने माझ्यात आलेलं शहाणपण आता नातेवाईकांना दिसायला लागलं आणी नववीतच लग्नाची धोंड माझ्या गळ्यात बांधायला निघाले. आईने ठाम सांगितलं "मी जे भोगतेय ते तिच्या वाट्याला नकोय मला. तिने शिकून स्वतःच्या पायावर उभं रहावं. मग बघु लग्नाचं., आत्ताच म्हातारी नाही होत ती". मला अभिमान वाटला तिचा. चाळीतल्या बऱ्याच घरातल्या लेकी, आई-बापाला डोईजड वाटायच्या. तिथे ईतक्या बेताच्या परिस्थितीत सुद्धा तिला तिच्या लेकीचं ओझं नव्हतं. माझ्याकरवी स्वतःची स्वप्नं साकार करायची होती तिला. जे मला नाही जमलं ते माझ्या लेकीला तरी करायला मिळावं वाटायचं. आम्ही सगळे मिळून कुटुंब चालवत होतो. दोन वेळचं नेटकं जेवून सुखी होतो.

पुढे हळूहळू गरीबी सैलावली. वडिलांनी कुठेतरी छोटीशी नोकरी सुरु केली. तिच्या जिद्दीने त्यांना ही पुन्हा उभं राहण्याचं बळ मिळालं. पप्पांसोबत बाकी दोन मित्रांचीही नोकरी गेली त्यांनी सरळ गावचा रस्ता धरला. पुढे वाताहत झाली त्या कुटुंबांची. आईने हाच पुढचा विचार करून ईथेच मुंबईत रहायचं ठरवलं. आमच्या शिक्षणाची घरातल्या-बाहेरच्या सगळ्याच कामांची जवाबदारी एकटीने अंगावर घेतली. वडिलांना वाईट मार्गापासून परावृत्त करत पुन्हा संसाराची गोडी निर्माण केली. तिने आमचा विचार केला.

आई जितकी खंबीर तितकीच हळवी होती. दहावीच्या परिक्षेसाठी माझी लेक लांबच्या शाळेत परिक्षेला जाणार तिला निदान दोनतरी चांगले कपडे घ्यायला हवेत असं तिला मनापासून वाटलं. म्हणून तिनेच तिच्या मिळकतीतून पैसे बाजूला काढलेले. मीच सोबत जाऊन पंच्याहत्तर-पंच्याहत्तर चे दोन ड्रेसपीस घेतलेले. यावेळी दोन्ही ड्रेस बाहेरच्या टेलरकडून शिवून., गळ्याला हाताला तुला हवी तशी डिझाइन करून घे" म्हणाली. मला प्रश्न पडला तिच्या ह्या वागण्याचा पण लवकरच त्याचंही उत्तर मिळालं. शेजारच्या बाकी पोरीबाळींसमोर माझी लेक उगाच बुजायला नको असं वाटायचं तिला म्हणून चाललेला हा तामझाम.

अगदी वेडाबाई होती ती. मी नोकरीला लागल्यावर पहिल्यांदा घरच्या सगळ्यांना हॉटेलमध्ये जेवायला नेलं तर घरी आल्यावर माझ्या तोंडावर हात फिरवून कडा-कडा बोटं मोडली आणी रडायलाच लागली. म्हणाली "तायडे तुम्हा पोरांची काहीच हौसमौज केली नाही ग मी. तुम्हाला वाटत असेल ना देवाने का यांच्या पोटी आम्हाला दिलं..?" पप्पांची नोकरी जाणं आणी तिच्या संसाराची घडी विस्कटणं हा एक वाईट भाग होता तिच्या आयुष्यातला. तो संपला तरीही त्याचे व्रण कायमचे कोरले गेले तिच्या मनावर. तिच्या परीने तिने पुरेपूर प्रयत्न केला आमचं बालपण सुखात घालवण्यासाठी पण तरीही ती स्वतःवर नाखुष होती. पुढे ती आजारी पडली आणी तिची सहनशीलता संपली. आता ऋण फेडायची जवाबदारी आमची होती. डायलेसीस,इंजेक्शन, दिवसाआड हॉस्पिटल वारी अगदी कंटाळून जायची. लहान कोकरु होऊन माझ्या कुशीत रडायची. मी, पप्पा तिची काळजी घ्यायचो तर चांगलेच लाड करून घ्यायची.,हट्ट करायची. मनसोक्त बालपण जगून घेतलं शेवटच्या वर्षात. माझ्या लग्नानंतर नातवंडासाठी माझ्या मागे टुमणं लावलेलं तिने. तिचा आजीपणा मिरवायचा होता तिला. तिची ही ईच्छाही पूर्ण होण्याआधीच अवघ्या पन्नाशीत तिचं आयुष्य संपलं.

आजही माहेरी गेले की तिची उणीव भासतेच. तिचा जीवनप्रवास माझ्यावर एक कायमची छाप सोडून गेला. कमीतकमी साधनात सुखी आयुष्य कसं जगावं हे शिकवून गेला. माणूस खचला की संपला. कुठलंही संकट आलं तरी आपण आपल्या जागी तग धरुन राहायचं. कोलमडायचं नाही. हे तिचं प्रभावी वाक्य पून्हा-पून्हा उठून जगायला उस्फूर्त करतं..
@$m!

✍✍रुपाली शिंदे.

Comments

Popular posts from this blog

#गंपू_मिंमा

गंपूच्या गोष्टी - माझा छकुला effects

आईची रेसिपी - गुलगुलं