चांदणस्पर्श



चांदणस्पर्श..!


दिवेलागणीला मागचं दार उघडून ग्यालरीत आले आणी समोरच चंद्र झाडाआड लपलेला दिसला. अगदी शांत, शीतल चांदणं....,
अलगद थंड  वाऱ्याची झुळूक आली.., आणी मनात कुठल्याशा गाण्याची शोधाशोध सुरु झाली.
पण कुठलं गाणं...??,,, अगदी बराच वेळ आठवेना ते गाणं. असं मुद्दाम काहीतरी आठवायला गेलं कि मेंदू आडग्यासारखा रुसुनच बसतो.

घरातून अंगणात येरझाऱ्या घालून सुद्धा गाण्याची एकही ओळ लक्षात येईना. आत्ता हल्लीच तर ऐकलेलं...कितीदा त्यातल्या ओळी गुणगुणत होते...."चांदणं....Ss..अंगणी..Ss" ईतकंच आठवे पण पुढचं, मागचं सपाट....

असं काही माहिती असलेलं ऐनवेळेस आठवेना कि ते आठवेस्तोवर चैन पडत नाही हे मात्र खरं. नेहमीची कामं हातावेगळी करत करत मेंदूच्या आठवण कप्प्यात गाण्याचा शोध सुरु ठेवलेला. कंप्युटर बॅकअप मधे सर्च सुरु ठेवल्यावर कसा तो डिटेक्टिव्ह भिंग (microscope)प्रत्येक कप्प्यातल्या पुस्तकांवर गोल गोल फिरुन शोधून काढतो तसंच काहीतरी  माझ्या मेंदूत सुरु असावं वाटलं. शेवटी आमच्या डोक्यातल्या गुप्तचर सूक्ष्मदर्शकाने ते गाणं शोधलंच.

स्वयंपाक घराच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहिलं तर आता चंद्रच दिसेनासा झालेला. त्याने त्याची जागाच बदलली होती. फार वेळ लागला गाणं आठवायला.. मग म्हटलं एवढी डोकेफोड करून गाणं आठवलंय तर आता गुणगुणुया  तरी.... .

"तुझ्या रुपाचं चांदणं.....
माझ्या अंगणी सांडलं."

हि एकच ओळ आठवली पुढचं इंटरनेटवर शोधलं. गाण्याची ओळ गुगल केली पण असं गाणंच नाही हे लक्षात आलं. आमच्या मेंदूने चुकिचं काही तरी सेव्ह केलेलं बहुतेक. आता तर अजूनच वाईट वाटलं. आपल्या सारखाच आपला मेंदू ही धांदरट आहे कळलं. घाईघाईने काहीतरी ऐकलं, घाईतच अर्धवट सेव्ह केलं.

ह्म्म....
असो, त्या क्षणी दारात उभी असलेली मी, समोर झाडाआडून डोकावणारा पोर्णिमेचा चंद्र आणी अंगणभर पसलेला त्याचा सौम्य प्रकाश...या परिस्थिती ला साजेसं काहीतरी गुणगुणायला शोधत होते. आणी ही ओळ तिथे परफेक्ट बसेल म्हणून मेंदूने शोधून दिली... त्याने त्याचं काम चोख केलेलं....कशाला रागवायचं बिचाऱ्या बिनपगारी मेंदू वर.... आणी चांदोबा काय आज पुन्हा येईलच की दारात.... गुणगुणेन मी माझ्याच ओळी..

 "तुझ्या रुपाचं चांदणं..
माझ्या अंगणी सांडलं"
उजळली धरणीमाय
स्पर्शचांदणं लेऊनं"

@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬