#मी_झाड_असते_तर..??

#मी_झाड_असते_तर..??



कलिंगड खाताना बी गिळली की पोटात झाड उगवतं..... ह्याची भयंकर भीती तेव्हा अनुभवली जेव्हा हा किस्सा घडला...

मी शाळेत तिसरी-चौथीला असेन. उन्हाळी सुट्टी सुरु झालेली. पप्पांनी आणलेलं कलिंगड त्या दिवशी दुपारी खाल्लं आणी मी खेळायला मागच्या गल्लीत गेले.  ते खाल्या नंतर संध्याकाळी दोन्ही कानात खूप खाज यायला लागलेली. घसा खवखवत होता. ही खरंतर सर्दी-खोकला होण्याची लक्षणं. पण मैत्रिणीने अचानक विचारलं "तू कलिंगडाची बी गिळलेलीस का...? गिळली असशील तर मेलीसच बघ...तुझ्या पोटात आता कलिंगडाचं झाड उगवणार...कानातून, नाकातून, तोंडातून फांद्या बाहेर येणार."  या डेंजर माहिती वर तिथेच खेळत असलेल्या बाकीच्या तीन-चार जनांनी पण शिक्कामोर्तब केलं. मस्त  घाबरगुंडी उडाली. मला उगाच मी बी गिळलीये असंच वाटायला लागलं.

आमच्यातलंच कुणीतरी म्हणालं " अगं जा आईला सांग लवकर, डॉक्टरकडे जा...ते पोट कापून लग्गेच बी काढून टाकतील.." हे ऐकून तर पोटात मोठ्ठा गोळाच आला.

आईला सांगितलं तर ती डॉक्टर कडे नेऊन माझं पोट कापायला लावेल. म्हणून तिला सांगणं तर मी तेव्हाच कँसल केलेलं. पण नाही सांगितलं तर पोटात झाड उगवेल ह्याची भीती वाटत होतीच. संध्याकाळ ची रात्र झाली. आता तर नाकात सुद्धा खाज यायला लागलेली. मधेमधे शिंका येत होत्या. मी सारखी आरशात आपले  कान-नाक-तोंड चेक करत होते.. कुठुन एखादी फांदी बाहेर येतेय का बघत होते. रात्री बिलकूल जेवले नाही की पाणी प्यायले नाही. कुंडीत पाणी नाही घातलं की झाड मरुन जातं हे माहिती होतं ना.

झोपताना मनातल्या मनात देवाला खूप मस्का-पॉलिश करत होते. "देवा मी सगळं ऐकेन तुझं, खूप अभ्यास करेन, आईला त्रास नाही देणार फक्त तू मला झाड नको बनवू....."पासून सुरु केलेलं गाऱ्हाणं शेवटी ......."मला कलिंगडाचं नको हवं तर मोगऱ्याचं झाड बनव.." ईथपर्यंत आलेलं.

का...?? तर कलिंगड खूप मोठ्ठं असतं मला उचलणार नाही. आणी आंबा, पेरुचं झाड झाले तरी सगळी मुलं माझ्या डोक्यावर चढून काठीने आंबे,पेरु पाडतील म्हणून आपलं फुलाचं झाड निवडलं. त्यात मोगऱ्याचा सुगंध मला आवडतो. म्हणून फार-फार विचार करुन मोगरा बनायचं ठरवलं.

मी फक्त आजची रात्रच आईपप्पांसोबत या घरात झोपणार. उद्यापासून मला कुंडीत रहावं लागणार.,म्हणून गोधडीत तोंड खुपसून कसलं रडून घेतलं मी...! कधी कोणासठाऊक रात्री झोप लागली. पण स्वप्नात मी स्वतःला मोगऱ्याचं झाड झालेलं पाहिलं. आमच्याच अंगणात होते मी. हातांना हिरवी पानं फुटलेली, तर पायांना मुळं. मी त्यावेळी ही स्वतःला माझ्या आवडत्या पिवळ्या फ्रॉकमध्येच दिसत होते. आई खूप रडत होती., मला असं झाड झालेलं बघून. मीही हुंदके देत रडत होते आणी टपाटप मोगऱ्याची फुलं पाडत होते. माझ्या मैत्रिणी फुलं वेचून गजरे बनवायच्या तयारीत होत्या. ईतक्यात कुणीतरी येऊन माझ्या पायावर पाणी घातलं.. मी पाय हलवले आणी झोपेतून जागी झाले.

पहाटेचे साडेचार-पावणेपाच झाले होते. मी खाली गोधडीवर झोपले होते. पप्पा होते माझ्या पायाजवळ त्यांची आज सकाळची शिफ्ट म्हणून कामावर जायची तयारी करत होते. आतून स्टोव्हचा फर्र्..फर्र आवाज येत होता म्हणजे आई आत स्वयंपाक करण्यात मग्न होती. पप्पानी पाणी प्यायला घेतलेला तांब्या माझ्या पायाजवळ कलंडला म्हणून ते पुसण्याने पुसत होते. ईतक्याच अचानक मला ते झाडाचं आठवलं म्हणून मी. मी माझे हात-पाय कान नाक तपासून बघितले.. फांद्या नव्हत्या आल्या. मी पुन्हा झोपी गेले.

सकाळी सातला उठल्यावर मात्र आईला सारं काही सांगितलं. अर्थातच तिने मला वेड्यात काढलं आणी खूप हसली माझ्यावर. पण मी रात्रभर उपाशी होते म्हणून पटकन खायला आणून दिलं. त्यादिवशी दुपारी मैत्रिणींना भेटल्यावर., पोटात झाड न उगवण्याचं कारण.."मी रात्रभर पाणी न पिता झोपले म्हणून बी मरुन गेलं" असंच सांगितल्याचं आठवतं. निदान त्या क्षणी तरी एवढा मोठा शोध लावणारी या जगातली सर्वात हुशार वैज्ञानिक तुच आहेस अशीच भावना होती सगळ्यांची.

@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

लिमलेट-अंकल..🍬🍬

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या