गंपुल्या_गोष्टी_खोडकर_गंपू

#गंपुल्या_गोष्टी_खोडकर_गंपू

युग मोठा होतोय तसतसा अधिकच रंजक आणी खोडकर प्राणी होत चाललाय. हल्ली रोजचा एक किस्सा असतो त्याच्या उशीचा. त्याला त्याच्या उशीवर चुकून आमचा हात पडलेला, डोकं आलेलं दिसलं की सगळी शक्ती पणाला लावतो आणी त्याच्या उशीवरुन ढकलून बाजूला करतो. त्याचा पप्पा त्याच्या वरचढ, मुद्दाम त्याच्या उशीकडे सरकत जाऊन उशीचा कोपरा पकडेल आणी त्याला छळेल., की हा अजून खवळतो. रोज रात्री झोपताना दोघांची भांडणं. ह्याचा अगदीच नाईलाज झाला की रडारड सुरु.."अडे हा माझा जागाये..ते माझी उशी हाय...तू जा तिकडे.." करुन ऊशीच्या दोन्ही बाजूला हात ठेवून जागा अडवतो. किमान पंधरा-वीसमिनिटं हे नेहमीच असतं. मग पेंगुळला की कुठली उशी कुठलं काय..

एका बेडशीट सेटवर दोन सारखे उशीकव्हर येतात. ते दोन्ही आम्हा नवराबायको च्या उशांना लावते. आणी युग च्या उशीसाठी वेगळं फुलांच,पण बेडशीट कलरशी मिळतं-जुळतं कव्हर घालते. तर त्याला उगाच त्याची उशी स्पेशल-बिशल वाटते.

सोबतीला त्याची म्याऊ-चादर,आणी सगळ्यात छोटा टेडी त्याचाच बेबी म्हणून उशीवर असतो.  पण रात्री झोपेत, ना उशीचं ध्यान असतं ना चादरीचं. मग पप्पांनी कुशीत गुरफटून घेतलेला दिसतो. आणी त्याचा बेबी उगाच माझ्या अंगाखाली सापडतो.

सकाळी दोघा बापलेकांना काय प्रेमाचं भरतं आलेलं असतं. "तु माझा कुकीये ना..? "म्हणत परत-परत चिकटून झोपतात. "अरे उठा गुडमॉर्निंग झाली. स्कूल आहे, टीचर येईल आता लाफटॉप(लॅपटॉप)वर." म्हणत मी उठवत असते. तरी त्याचं आपलं... "जडा थांबा...अज्जु गुमॉन्निंग नाहीये.."सुरु असतं. आज मी म्हणाले "जरा घड्याळ बघ, वाजले किती...उशीर होतोय चल लवकर ". तर अगदी ठामपणे म्हणतो "अडे ते च्चालू नाय्ये..तू जोप"🙄.ईतकं धडधडीत खोटं आपल्याला तर नाही जमलं कधीच.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬