#धरिला_पंढरीचा_चोरं...

माझा आवडता अभंग
युग अगदी लहान असताना... सतत ऐकू-गाऊ वाटायचा. हा अभंग लहानपणी वाचला तेव्हा विठ्ठलही एका लहान मुलासारखा अवखळ असेल वाटला. आईपुढे दुडुदुडु रांगत पळणारा, मधेच तिच्या नजरेआड होऊन लपणारा. अत्यंत लाघवी, निरागस असा,आपल्या हळव्या मनाच्या आईला गोड छळणारा. तिचं चित्त चोरणारा लबाड चोर लपून बसलेला तिला सापडतो आणी कोण आनंद होतो हे त्या माऊलीलाच ठाऊक.

जनाईलाही ज्याला वात्सल्य भावनेने आपल्या ह्रदयात बांधून ठेवण्याचा मोह होतो असा बाळ वाटायचा हा विठ्ठल. "तू माझाच आहेस नं..?आणी मीही तूझीच फक्त..?मग मला सोडून कुठे ही जायचं नाही" असा लाडिक हट्ट करणारी माऊली जनाईत दिसली. शब्दांची बेडी पायात अडकवून या भगवंतालाच कैदेत ठेवण्याचा तिचा अट्टाहास. आणी तिच्या ह्या भक्तीपुढे काकुळतीला आलेला विठ्ठल. फार छान वर्णन भक्त आणी देवाच्या नात्यातलं.
माझ्या मनाने मला या अभंगाचा बोध हा असाच करवून दिलेला. आता हे असे का हे मलाही नाही माहीत.

एक मात्र विशेष आहे, ज्या विठ्ठलाच्या मुर्तीला मी प्रत्यक्षात कधी कुठल्या मंदिरात जाऊन पाहिलं नाही की पूजलं नाही.फार फार तर चित्रात,फोटोत पाहिलं. त्याला फक्त या संतांच्या अभंगांनी माझ्या मनात एक वेगळं स्थान करुन दिलं. तरी त्याच्याविषयी ईतकी ओढ का बरं वाटते. कधीतरी प्रश्न पडतो.. असं काय असेल या विठ्ठलात की त्याच्या नाममात्र उल्लेखाने मनावर मोहिनी घातल्यासारखे होते. नुसतं विठ्ठल-विठ्ठल म्हटलं जरी ना..,तरी सर्वांगात ते नाम दुमदुमायला लागतं. पांडुरंग-पांडुरंग नामाच्या नादात तासाचं काम दोन तासावर जातं माझं. ईतकं हरवायला होतं. आता ही अतिशयोक्ती वाटेल खरी पण माझा मुलगा अगदी जेव्हा नुकताच रांगायला लागलेला तेव्हा त्याच्यातही मी विठ्ठल शोधतेय असे वाटायचे मला. लहान बाळात देव दिसणं किंबहुना तो आपण पाहणं सगुण साकार भक्तीचं लक्षण म्हणता येईल का..?पण तो विचार मी लगेच झटकून टाकायचे., कदाचित घाबरूनच. असं म्हणतात उगाच एखाद्याला देवपण देऊ करु नये. ते पेलवण्याची ताकद ही त्याच्याकडे असायला हवी. मला माझ्या कुतुहलाचं,अपेक्षांचं ओझं त्याच्यावर टाकणं पटत नाहीच. तसंही मनुष्ययोनीत आलेल्यांना देवपण मिळवणं सहजी शक्य नसतं. हे ऐकून-वाचून आलेलं ज्ञान 🙏. आणी भक्त वगैरे शब्दासाठी मीही पूरक नाहीच.

खरे पाहता मी ईश्वरी नामांचा साधा जपसुद्धा फारसा केला नाही. अगदी मोजून 108 वेळा ओंकार वगैरे तेपण कधीकाळीच. पण तो केल्यावर डोकं गरम होऊन..डोळे जड होतात.अंगात कोवळीशी थरथर जाणवते. शरीर फार हलकं पिसासारखं आणी मी थकून चक्क गाढ झोपते. त्या झोपेला तोड नसते. चिंतामुक्त,समाधानी असते ती. त्यानंतर दिवसभर मी बरीच शांत शांत असते.समोरच्यालाही जाणवेल ईतकी शांत. एरव्ही तोंडपट्टा चालूच. मग आता ते ओंकार करणं मला पेलवत नाही की सकाळपासून पळत असलेली मी अचानक अर्धा तास एका जागेवर शांत डोळे मिटून बसते म्हणून होतं असं कोणासठाऊक. असो देव,ईश्वर हे उच्चार फक्त ऐकून-वाचूनच माहिती.  तेव्हा देव या संकल्पनेतलं मला काहीच सांगता येणं शक्य नाही कारण मला त्याबद्दल पूरेसं ज्ञानच नाही. कुतूहल मात्र आहे.
देवाचं म्हणून एकच जाडजूड पुस्तक वाचलंय आजवर., त्या अनुभवाबद्दल ही लिहीन एकदा.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬