#लॉकडाऊन_आठवणी

आज सकाळपासून ईथे कोणी शाळेचं मैदान साफ करत होते. परवा फणस उतरवले. पोपट कावले होते, त्यांचे फणस नेले म्हणून. गेल्यावर्षी फणस झाडावरच पिकले तर त्यांची मज्जा झाली. खूप सारे पोपट आले होते तेव्हा.

आमच्या बाल्कनीत समोरच शाळेचा आंबा आहे. गेल्यावर्षी खूप कैऱ्या लागलेल्या. यावर्षी एकही नाही. नाहीतर कैऱ्या आणी फणसाच्या वासाने सकाळीच वानरसेना यायची. माझ्या कुंड्या ची नासधूस केलेली एकदा. घाबरून आता ग्रील लावून घेतली ईथे. नकळत माझ्या गोऱ्या मंकीला उचलून नेतील त्यांच्या कळपात म्हणून. तर या वर्षी कैरी लागलीच नाही. आणी फणसही लवकर उतरवले. वानर नाही येणार बहुतेक. एका बाजूला नारळ आहेत ऊंचावर, कधी गळून पडतात कळतच नाही.

तीन महिने शाळा ही बंद होती. शाळा सुटली की धुळधुळ ह्वायची बाल्कनीत. आणी ती सकाळी परेड करताना एक धुरळा नुसता. त्यातल्या त्यात ईटुकल्या पोरांचे स्पोर्ट्स भारी असतात बघायला. काहींच बाळसं सुटलेलं नसतं. पळण्याचा कार्यक्रम चाल्लेला, त्यातलाच एक गठल्या ईकडून तिकडे पळेस्तोवर गाणं संपायचं. बाकीचे पळून पोहोचले नी परतीच्या मार्गाने फिरुन आले तरी हा गुटुगुटु करत पोहोचायचा. मग मधेच कधीतरी अर्ध्यातूनच परत फिरून बाकिच्यांमधे सामील व्हायचा. एकाचा बूट किंचित मोठा की काय तो मधेच निघाला. पण हा मिल्खा सारखा एका बुटावर पळत पुढे गेला. शर्यत जिंकायची होती,पक्का जिद्दी. या गठल्या च्या एकदम विरोधी होता हा. कोणी एक चड्डी पकडून पळतोय. तर कोणी पायावर पाय पडला म्हणून मधेच रडारड करुन फत्कल मारुन बसलेली. तिकडे पुकारणारा माणूस हसून बेजार. आम्ही मजा बघतोय सगळी.

त्यांचे २६ जानेवारी,१५ऑगस्टचे कार्यक्रम बाल्कनीत बसून चहाचा घोट घेत एंजॉय करते कधीतरी. नृत्य,गायन,भाषण, बक्षीस समारंभ सगळं सगळं बघून घेते. अजूनही 'आम्ही ठाकर ठाकर' गाणं नाचासाठी असतं पाहून बरं वाटतं. बाकी सारं ईंग्रजीतच पण एका कोणीतरी मराठी प्रतिज्ञा म्हणून दाखवली तरी मी मनाने माझ्या बालपणात पोहोचते. शाळेचा गणवेष, माझं बाकडं, आणी एकसुरात चाललेली प्रतिज्ञा. आठवणींना उजाळा मिळतो. रमण्यासारखं बरंच काही आहे ईथे. बहुधा घरापेक्षा बाल्कनीच जास्त वापरतो आम्ही.

आता हे सारं पुन्हा केव्हा पाहता येईल...कोणासठाऊक..

आज ईतक्या दिवसांत कोणीतरी आले शाळेकडे.  मैदानातला पाचोळा साफसूफ करून ढीग-ढीग जाळले. धूर झालेला पण पाचोळ्याचा जळका वास आवडतो मला. आत्ता पाऊस धो-धो कोसळतोय.  ती राख भिजतेय, मस्त सुगंध सुटलाय.. विजा कडाडल्या की तो आवाज खिडक्यांवर आदळतो मी जागीच मग. सारं शांत झालं की येईल झोप. तोवर गंपूच्या कानावर हात ठेवून बसते दचकतो नं तो झोपेत 😊.
@$m!

Comments

Popular posts from this blog

#तात्याविंचू #बाबाचमत्कार #ओमफट्स्वाहा

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

लिमलेट-अंकल..🍬🍬