Posts

पाल........

पाल....... भीती मनात असतेच नेहमी पण जोवर डोळ्यांना दिसत नाही तोवर आपण नाहीच घाबरत. आज दिसली मला ती स्वयंपाक घरात खिडकीच्या एका कोपऱ्यात. तिचे चमचमणारे डोळे माझ्यावरच रोखलेले. राखट पिवळसर,शेवाळी रंगाचा तो बुळबुळीत प्रकार पाहून शिसारीच आली मला. पावसाचे दिवस, लाईट्स गेलेत. बाहेर मळभ दाटून आलेलं. भर दिवसा घरात काळाकुट्ट अंधार भरुन राहिल्या सारखा. मस्त पांघरून घेऊन गुडुप झोपावंसं कितीही वाटलं तरी आजची दिवसाभरातली कामं करणं भाग आहे. खिडक्या दरवाजे उघडून घरात प्रकाश झाला कि कंटाळा जाईल आपोआप म्हणून खिडकी उघडायला गेले तर समोरच ही बया. तिला बघून झोपच उडाली. आज तर सकाळपासून खिडकी उघडलीच नव्हती. म्हणजे कालच दिवसाभरात कधी तरी एन्ट्री झाली असणार या मॅडमची. रात्री घरभर फिरून मग ही जागा लपण्यासाठी फायनल केली असणार. असो पण आता दर्शन दिलय म्हटल्यावर तिला तिथून हुसकावून लावायची जबाबदारी माझीच. स्वंयपाक करतानाच पटकन पडली खाली गॅसवर तर प्रॉब्लेम. खिडकीचं दार उघडून हातात झाडू घेऊन तिला हाकलवायचा कार्यक्रम सुरु केला. पण ती ढिम्म् हलेल तर शप्पथ. जरावेळाने सरपटत थोडं पुढे येऊन मान वर उचलून गळ्यातले गलग...

माझी खवय्येगिरी - मसाला ढेबऱ्या

Image
मसाला ढेबऱ्या.. ढेबरी साहित्य : थालीपीठ भाजणी दोन वाट्या, एक कांदा बारीक चिरलेला, आले-मिरची-लसूण पेस्ट एक चमचा, बडीशेप-धने पावडर एक चमचा, गरम मसाला पावडर एक टीस्पून, कोथिंबीर बारीक चिरलेली दोन चमचे, हळद पाव चमचा, मीठ, तेल,पाणी अंदाजाने. सजावटीसाठी : बारीक चिरलेला कांदा, चिरलेला टॉमेटो, चिरलेली कोथिंबीर, दोन चमचे बटर, चीज क्युब, टोमॅटो केचअप. कृती : ढेबरी साहित्यातले सर्व पदार्थ एकत्र करून कणकेसारखा(किंचित घट्ट) गोळा मळून घ्या.एका प्लास्टिक पिशवीवर  हलक्या हाताने, ढेबरी(थालीपीठ पेक्षा किंचित जाड) थापायला घ्या. एक एक ढेबरी थापत थापतच तव्यावर किंचित तेला वर भाजायला घ्या. गावी चुलीतल्या निखाऱ्यावर भाजलेली ढेबरी उत्कृष्ट लागते. दोन्ही बाजूने खरपूस भाजलेल्या ढेबऱ्या डीशमध्ये काढून घ्या. त्यावर एका बाजूला बटर लावून मग कांदा,टोमॅटो, कोथिंबीर घालून सजावट करा. सर्वात शेवटी, केचअप आणी चीज किसून घाला. आणी सर्व्ह करा. It's yummy👌👌.  लहान मुलांसाठी परफेक्ट पौष्टिक पिझ्झा. @$m!

गंपूच्या गोष्टी - गंपूचं मनोगत (भाग१)

गंपूच्या गोष्टी वय १७ महिने गंपूचं मनोगत- भाग १ या आई-पप्पांना ना काही कळतंच नाही, नुसतं मला ओरडतच असतात. मी तरी कित्ती गुणी बाळासारखा वागतो, आईला पप्पांना कित्ती मदत करतो माहितेय का..? तरी सुद्धा नेहमी मला ओरडाच बसतो. एकदा ना मला खुप-खुप भूक लागली होती. तर मी स्वयंपाकघरात गेलो. आई कामात होती.,नेहमीच असते. मी आता मोठा झाल्यापासून माझ्यासाठी वेळच नसतो तिच्याकडे म्हणून माझा मीच खाऊ शोधला, किसलेल्या नारळाचं ताट तिथेच खाली ठेवलेलं तिने, मी फक्त थोडसंच, दोन मुठी खोबर घेतलं आणी बाहेर आलो, खाताना एकदम थोडुसंं सांडलं, आता मी छोटा बाबु आहे ना मग खाऊ खाताना सांडतो कधीतरी. पण मी खाली सांडलेला खाऊ अज्जिबात उचलून खाल्ला नाही. आई बोलते खाली सांडलेला खाऊ शी-शी झालेला असतो. मग मला अजून खाऊ पाहिजे होता. मी परत आत खोबरं आणायला गेलो तर आईने ताट उचलून कट्ट्यावर ठेवलं. मी कट्ट्यावरचं ताट ओढायला गेलो आणी त्या ताटाने पटकन उडीच मारली. ते धाssडकन् खाली पडलं. सगळं खोबरं खाली सांडलं. कित्ती कित्ती ओरडली मला आई.😭😭😭 मला खूपच रडू आलं म्हणून मी तिला मिठी मारली तरी तिने मला उचलून सुद्धा नाही घेतलं. आणी त...

माझी खवय्येगिरी - झटपट झुणका

Image
#झुणका या पावसाळ्यातली पहिली अळुवडी काल केली. अळुची पानं चांगली ताजी मिळाली. वडी पण उत्तम जमली. पण दरवेळीसारखा पिठाचा अंदाज नाहीच आला. नेहमी कमीच पडतं, ह्यावेळी जास्तंच झालं. अळुच्या तीन वळकट्या होऊन ही थोडं मिश्रण उरलंच. आता एवढं तिखट,मीठ,ओवा, तीळ, कोकम पाणी, आले-लसणीचा ठेचा घातलेलं ते मिश्रण मला टाकवेना. त्याची भजी करावीत तर आधीच  घरात पावसाळी आजारपणं सुरु आहेत. तळलेलं नकोच म्हणून वडीसुद्धा थेंब-थेब तेलावर परतून घेतली. उद्या बघु काहीतरी करु म्हणून ते मिश्रण तसंच एका डब्यात काढून फ्रिजमध्ये ठेऊन दिलं. आज सकाळी नाश्त्याला काय करावं सुचेना. मग तो कालच्या पिठाचा डबा फ्रिजमधून काढला, कुकरमध्ये ते पीठ वाफवून घेतलं. तोवर पराठ्यांची तयारी करुन ठेवली. कुकर थंड झाल्यावर हातानेच ती उकड कुस्करून मोकळी केली. कढईत कढीपत्ता, मोहरी, कांद्याची फोडणी तयार करून त्यात ते मोकळं बेसन घालून परतलं. वरुन असावं म्हणून चवीला अजून थोडं तिखट मीठ घातलं कोथिंबीर पेरली. सोबत प्लेन पराठे करुन केला सर्व्ह नाश्ता. पण मनात शंका होतीच काय नी कसं बनलंय देव जाणो. नाहीच आवडलं तर चहा पराठा हा सेकंड ऑप्शन म्हणू...

गंपूच्या गोष्टी - जाहिरातींच वेड

गंपू वय १४ महिने माझ्या घराला आता शांततेची सवय अजिबात नाही राहिलेली. दिवसभर युगचा दंगाच सुरु असतो नुसता. आणी जरा कुठे  शांत शांत झालंच तर समजून जायचं हा गंप्या काहीतरी उचापती करतोय. आता तर काय उठसूट टपातल्या पाण्यातच जाऊन बसतो खेळत.  आणी मग मी त्याला विचारलं "अरे तू काय Hippopotamus आहेस का ?" तर हा आपला हसतच सुटतो. काय अप्रूप वाटतं त्याला या 'हिप्पोपोटमसचं'!, बेंबीच्या देठापासून हसतंच सुटतो हा शब्द ऐकला की. त्याचं ते  निखळ हसणं, त्यातले उत्कट भाव इतकं भारी वाटतं ना बघायला! म्हणजे मला खरंतर रागवायचं असतं त्याच्या या पाणी उद्योगावर पण मी ते विसरुन  त्याच्या हसऱ्या, गोबऱ्या-गालांवर आलेली चकाकी आणी त्यात मध्यभागी क्वचितच दिसणारी खळी यातच हरवते. खळखळून हसल्यावर डोळ्यांत आलेले थेंबभर आनंदाश्रू आणी त्या थेंबभर पाण्यामुळे चमकणारे डोळे बघतच रहावे. हि लहान मुलं हसतातच इतकी गोड ना की आपण विरघळतोच.  'हिप्पोपोटमस' हा शब्द त्याने टिव्हीवर एका लहान मुलांच्या जाहिरातीत ऐकला. तेव्हापासून जेव्हा जेव्हा ऐकला तो खळखळून हसलाय. हो त्याला जाहिरातींच भयंकर वेड. कृष्...

गंपूच्या गोष्टी - गंपूबाळ आणी उकडीचे मोदक

Image
युग(गंपू) वय: १५ महिने गंपूबाळ आणी उकडीचे मोदक आज अंगारकी चतुर्थी!. गणपती बाप्पासाठी मी खास उकडीचे मोदक बनवायला घेतलेत. तशी उकडीच्या मोदकांची माझी पहिलीच वेळ, मला गव्हाचे तळणीचे मोदक करायची सवय कारण आईकडे तेच असायचे. मी ही तेच करायला शिकले मग तिच्याकडून.  गंपूला सांभाळून त्यात पहिल्यांदाच ह्या मोदकांचा प्रयत्न त्यामुळे सकाळीच स्वयंपाक झाला की तयारीला लागले. सारण बनवुन घेतले. आणी आधी गंपूला अंघोळ घालून झोपवले. हो!कारण त्याशिवाय मला काही शांतपणे ती उकड करायला मिळणारच नव्हती. उकड झाली की मी पीठ मळुन मोदक बनवायला घेतले. इतक्यात गंपूशेठ उठले. दिवसा त्याची झोप कमीच, अगदी वीस-एक मिनिटांची.   स्वारी ऊठून स्वयंपाक घरात आली आणी काय आश्चर्य..??,माझ्या नेहमीच्या अपेक्षेप्रमाणे तो आज अजिबात रडला नाही की मला येऊन मिठी मारली नाही. उलट शांत माझ्या बाजुला उभा राहुन बघत होता की मी काय करतेय. पण गंप्याची शांतता म्हणजे वादळापुर्वीची शांतता. ती सुद्धा अर्ध्या-एक मिनिटांची. तेवढ्या अर्ध्या मिनिटात त्याने उकडीचा मळलेला गोळा नीट निरखून घेतला. मी कसा त्यातला छोटासा भाग काढु...

गंपूच्या गोष्टी - गंपूचा योगाभ्यास

'युग' गंपू वयवर्ष - १२ महिने *गंपूचा योगाभ्यास* ४ महिन्याचा असताना त्याला कुणा नावडत्याच्या/अनोळख्याच्या मांडीवर दिले कि तो एकतर तुमच्या कानठळ्या बसाव्या इतक्या मोठ्याने रडा/ओरडायचा किंवा मांडीत झोपवल्या ठिकाणीच जमेल तेवढं अंग उचलून उसळ्या मारुन 'बॉडी स्ट्रेच' सुरु करायचा. मग हळुहळु पायाची बोटं तोंडात जातील अश्या पद्धतीचं 'पवनमुक्तासन'(बंदिस्त पवन----मुक्त करणारं हेच ते आसन) जमायला लागलं. पुढे बाळ रांगायला लागलं. पाय दुखलेकी 'वज्रासन' करायला लागलं. आवडत्या गाण्यांवर 'बटरफ्लाय योगा'ला आपसुकच अंगीकारलं. बसल्याजागी 'बेलीडान्स',बटकडान्स'पण होऊन जातो कधीमधी.... आता कुठल्याही आधाराशिवाय उभं रहायची मजा घ्यायला लागलाय. उभा राहून दोन्ही हातांची एकमेकांशी घट्ट युती करुन पाय जमीनीवर रोवायचे. समोरच्याला "बघारे मी उभा राहिलोय"च्या आविर्भावात ओरडून आपल्याकडे बघायला लावायचं. आणी आपण त्याच्याकडे बघून "अजून गडी डुलतोय" म्हणेपर्यंत याने उत्साहात 'ताडासन' करायला जायचं नी धपकन् खाली पडायचं. सकाळी उठताना 'सुर...